केंद्रातील राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या चर्चांना जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काही नव्या चेहऱ्यांना जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाबाबत केंद्र सरकार अथवा भाजपकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पंतप्रधान मोदी काही निवडक खासदारांसोबत चहापानाच्या माध्यमातून संवाद साधणार असल्याची माहिती समोर आल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. या भेटीत कोणते खासदार सहभागी होणार किंवा नेमका कोणता विषय चर्चिला जाणार, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.
यापूर्वीही पंतप्रधानांनी एनडीएतील खासदारांशी संवाद साधत विविध राजकीय आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्र सरकारच्या कामकाजात किंवा पक्षाच्या रणनीतीत काही बदल होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
दरम्यान, भाजपच्या संघटनात्मक पातळीवर झालेल्या बदलामुळेही मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला बळ मिळालं आहे. 17 ऑगस्ट रोजी पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या टीममध्ये 65 पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यातील मोठ्या संख्येने नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका तसेच 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
या नव्या संघटनेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे ते एकमेव नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या संघटनात्मक भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
याशिवाय स्मृती इराणी आणि राम माधव यांसारख्या नेत्यांना पक्षाच्या संघटनेत पुन्हा महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने भाजपच्या आगामी रणनीतीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पक्षात संघटनात्मक फेरबदल झाल्यानंतर केंद्रातील मंत्रिमंडळातही बदल होण्याची शक्यता आहे का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी लवकरच परदेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य बैठक आणि मंत्रिमंडळातील बदलांबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.
सध्या या सर्व घडामोडी राजकीय चर्चेपुरत्याच मर्यादित आहेत. केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच मंत्रिमंडळात नेमके कोणते बदल होणार आणि कोणत्या नेत्यांना नवी जबाबदारी मिळणार, हे स्पष्ट होईल. त्यामुळे मोदी सरकारच्या पुढील निर्णयाकडे दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.