नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात समाजातील सगळ्याच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला. अनेक योजनांची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. विमा क्षेत्रात आता 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यास मुभा असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
याआधी विमा क्षेत्रात 74 टक्के परदेशी गुंतवणुकीची मर्यादा होती. आता विमा क्षेत्र हे संपूर्णपणे परदेशी गुंतवणूकदारांसाठी खुलं करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत विमा क्षेत्रात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. तसेच, विमा क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, आजच्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात शेतीशी संबंधित स्टॉक्स वाढल्याचे दिसून आले.
हेही वाचा : BUDGET 2025 : मोदी सरकारकडून तरूण उद्योजकांसाठी मोठी संधी
कृषी क्षेत्रासाठी योजनांची घोषणा
कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. राज्यांच्या साह्याने पंतप्रधान धन धान्य योजना राबवली जाणार आहे असे अर्थमंत्र्यांनी म्हटले. या योजनेच्या माध्यमातून 100 जिल्हयांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार आहे.
तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार असून शेती उत्पादकता वाढवणे, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, माल साठवणूकीचे पर्याय, सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
हेही वाचा : BUDGET 2025 : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?
अर्थसंकल्पात ‘GYAN’वर भर…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, सरकारने ‘ग्यान’वर लक्ष केंद्रित केले आहे. GYAN म्हणजे G - गरीब, Y- तरुण, A- अन्नदाता आणि N - नारी शक्ती. या चार घटकांच्या अवतीभोवती फिरणारे आणि त्यांना दिलासा देणारे हे बजेट आहे, असे सीतारामन म्हणाल्या. आम्ही गेल्या 10 वर्षात बहुआयामी विकास केला आहे, असा दावा त्यांनी केला.