PM Modi Calls Gulf Leaders: पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आखाती देशांमधील महत्त्वाच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. यामध्ये ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक, कुवेतचे क्राउन प्रिन्स शेख सबा अल-खालिद आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचा समावेश होता. या संघर्षादरम्यान संबंधित देशांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधानांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून या कठीण काळात भारत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन दिले.
भारतीय समुदायाच्या कल्याणावर विशेष भर
या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची सुरक्षा हा होता. या देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास असून, युद्धाच्या सावटाखाली त्यांच्या सुरक्षिततेबाबत पंतप्रधानांनी तिन्ही नेत्यांशी चर्चा केली. तेथील भारतीयांचे कल्याण आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत मिळण्याबाबत नेत्यांनी पंतप्रधानांना आश्वस्त केले आहे. “पंतप्रधानांनी मंगळवारी दुपारी आखाती प्रदेशातील दोन अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करून प्रादेशिक शांततेवर भर दिला,” अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
सौदी आणि बहरीनच्या नेत्यांशीही संवाद
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान मोदी सातत्याने जागतिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. गेल्या 2 दिवसांत त्यांनी बहरीनचे राजा आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स यांच्याशीही संवाद साधला. अलीकडच्या काळात या देशांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करत, दहशतवाद आणि हिंसाचाराच्या विरोधात भारत एकजुटीने उभा असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
Had a productive telephone conversation with Crown Prince of Kuwait, H.H. Sheikh Sabah Al-Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah. India condemns violation of Kuwait's sovereignty and territorial integrity and stands with its people in this difficult hour. We underscored the… — Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026
शांती प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न
पंतप्रधानांनी केवळ आखाती देशांशीच नव्हे, तर जॉर्डनचे राजा अब्दुल्लाह द्वितीय, संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशीही चर्चा केली आहे. या प्रदेशातील बिघडत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करतानाच, संवाद आणि राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन भारताकडून करण्यात आले आहे. पश्चिम आशियातील स्थैर्य हे भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने भारत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.