नवी दिल्ली: रशियन सैन्यासोबत लढणाऱ्या एका भारतीयाने युक्रेनसमोर आत्मसमर्पण केले. साहिल मोहम्मद हुसेन नावाच्या या भारतीयाने काही दिवसांच्या लढाईनंतर आत्मसमर्पण केल्याचा दावा युक्रेनियन सैन्याच्या 63 व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडने केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी म्हटले आहे की ते या वृत्ताची चौकशी करत आहोत आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणतेही अधिकृत अपडेट दिलेले नाही.
हुसेनने आत्मसमर्पण केलेल्या युक्रेनियन सैन्याच्या 63 व्या यांत्रिक ब्रिगेडने टेलिग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. 1 मिनिट 45 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हुसेन लाल टी-शर्ट घालून रशियन भाषेत बोलत असल्याचे दिसून आले आहे.
युक्रेनमध्ये आत्मसमर्पण करणारा साहिल मोहम्मद हुसेन कोण?
साहिल मोहम्मद हुसेन हा गुजरातमधील मोरबी येथील रहिवासी आहे. 22 वर्षीय हुसेन रशियाला शिक्षणासाठी गेला आणि तिथल्या एका विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, तो ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अडकला आणि त्याला दोषी ठरवण्यात आले. रशियन न्यायालयाने हुसेनला सात वर्षांची शिक्षा सुनावली. तथापि, हुसेन तुरुंगात जाण्याची इच्छा नव्हती. त्याचवेळी, रशियन सैन्य अशा लोकांना शोधत होते, जे शिक्षेच्या बदल्यात युद्धात सेवा देऊ शकतील आणि हुसेनने शिक्षा टाळण्यासाठी रशियन सैन्यासोबत लढण्याचा निर्णय घेतला. रशियाच्या 'स्पेशल मिलिटरी ऑपरेशन'मध्ये सामील होण्यासाठी त्याने रशियन सैन्यासोबत करार केला आणि त्यानंतर त्याला तुरुंगातून सोडण्यात आले.
हेही वाचा: Gita Gopinath : 'डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने अमेरिकेला फायदा नाहीच, उलट महागाई वाढली;' गीता गोपीनाथ यांनी सुनावलं
हुसेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची कहाणी सांगत आहे की, "मी पहिल्यांदा रशियाला शिक्षणासाठी आलो होतो. पण मला ड्रग्ज तस्करीसाठी तुरुंगवास भोगावा लागला आणि सात वर्षांची शिक्षा झाली. मला तुरुंगात राहायचे नव्हते, म्हणून मी पोलिसांसोबत विशेष लष्करी ऑपरेशन्स करारावर स्वाक्षरी केली... तो माझा मार्ग होता."
हुसेन म्हणाले की, करारानुसार त्याला एक वर्ष रशियन सैन्यात सेवा करायची होती. त्याला सांगण्यात आले की त्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या देशात म्हणजेच भारतात परत पाठवले जाईल. जेव्हा मी करारावर स्वाक्षरी केली तेव्हा कोणीतरी सांगितले की मला सैन्यात सेवा दिल्याबद्दल 100,000 रूबल (रशियन चलन) मिळतील, कोणीतरी म्हटले 10 लाख, कोणीतरी म्हटले 15 लाख. पण त्यांनी मला काहीही दिले नाही असे हुसेनने सांगितले. त्याच व्हिडिओमध्ये, हुसेन स्पष्ट करतो की त्याला फक्त 16 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण मिळाले आणि 1 ऑक्टोबर रोजी त्याला युद्ध आघाडीवर पाठवण्यात आले. हुसेन स्पष्ट करतो की आघाडीवर आल्यानंतर त्याचा त्याच्या कमांडरशी वाद झाला आणि त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.
तो म्हणाला, "मी सुमारे 2-3 किलोमीटर अंतरावर असलेल्या युक्रेनियन खंदकाच्या ठिकाणी पोहोचलो, माझी बंदूक खाली ठेवली आणि म्हणालो, 'मला लढायचे नाही. मला मदत हवी आहे. मी कोणालाही मारले नाही, मी कोणालाही इजा केलेली नाही. मी नुकतेच तीन दिवसांपूर्वी येथे आलो आहे. मला युद्ध नको आहे, मला फक्त येथून निघून जायचे आहे."
हुसेन पुढे म्हणाले, "मी युक्रेनियन सैनिकांना सांगितले की मला रशियाला परत जायचे नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मला युक्रेनच्या तुरुंगात पाठवू शकता. शक्य असल्यास मला माझ्या देशात परत पाठवण्याची विनंती मी त्यांना केली." युक्रेनियन सैन्याच्या म्हणण्यानुसार, भीती आणि थकव्यामुळे हुसेनने युक्रेनियन सैनिकांसमोर आत्मसमर्पण केले.
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की, अलिकडेच सुमारे 27 भारतीय नागरिक रशियन सैन्यात सामील झाले आहेत. अलीकडेच आम्हाला माहिती मिळाली आहे की, रशियन सैन्यात आणखी काही भारतीय नागरिकांची भरती झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून आम्हाला ही माहिती मिळाली. आम्ही रशियामधील आमच्या मिशन आणि मॉस्कोमधील अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आमच्या नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी परत पाठवण्याची मागणी आम्ही केली आहे. सुमारे 27भारतीय नागरिक यात सामील आहेत आणि आम्ही त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.