मुंबई: 2025 च्या प्रयागराज महाकुंभ मेळ्यात तिच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने आणि डोळ्यांतील तेजाने भाविकांचे लक्ष वेधून घेणारी 'व्हायरल गर्ल' म्हणजेच मोनालिसा भोसले सध्या पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मात्र, यावेळी चर्चेचे कारण कौतुक नसून एक गंभीर कायदेशीर पेच आहे. 11 मार्च 2026 रोजी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मुस्लीम तरुण फरमान खानशी आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मोनालिसाच्या या लग्नाला आता वयाच्या मुद्द्यावरून ग्रहण लागले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या चौकशीत मोनालिसा ही सज्ञान नसून अल्पवयीन असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती 17 मार्च 2026 रोजी वकील प्रथम दुबे यांनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर. आयोगाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तपास पथकाने केरळपासून मध्य प्रदेशातील महेश्वरपर्यंत सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली.
महेश्वर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातील नोंदी तपासल्या असता, मोनालिसाची खरी जन्मतारीख 30 डिसेंबर 2009 असल्याचे उघड झाले. याचाच अर्थ असा की, लग्नाच्या दिवशी तिचे वय केवळ 16 वर्षे होते, जे कायदेशीर विवाहासाठी आवश्यक असलेल्या 18 वर्षांच्या अटीपेक्षा कमी आहे.
तपासात पुढे असेही समोर आले की, केरळमध्ये विवाह नोंदणी करण्यासाठी चक्क बनावट जन्म प्रमाणपत्राचा आधार घेतला गेला होता. या खोट्या प्रमाणपत्रावर मोनालिसाची जन्मतारीख 1 जानेवारी 2008 अशी दर्शवून तिला सज्ञान भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तपास पथकाने हे प्रमाणपत्र संशयास्पद ठरवत ते तातडीने रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रेमाच्या नावाखाली कायद्याची सरळसरळ पायमल्ली केल्याचा ठपका आता या प्रकरणावर ठेवण्यात आला असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मोनालिसाच्या या वयाचा गोंधळ आता फरमान खानसाठी कायदेशीर फास ठरणार आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर पोलीस ठाण्यात फरमान खान विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच 'पोक्सो' (POCSO) आणि अपहरणासह विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीशी विवाह करणे आणि त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, या आरोपांखाली आता फरमानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणाने आंतरधर्मीय विवाहाच्या वादाला आता गुन्हेगारी स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने या प्रकरणात गांभीर्याने हस्तक्षेप करण्याचे कारण म्हणजे मोनालिसाच्या पालकांचे आदिवासी असणे. पालकांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रांनुसार, हे कुटुंब अनुसूचित जमाती समुदायाचे असल्याचे निश्चित झाले आहे. या संपूर्ण घटनेमागे काही राजकीय किंवा मूलतत्त्ववादी संघटनांची भूमिका आहे का, याचा सविस्तर अहवाल आता केंद्र सरकारला पाठवला जात आहे. एका 'व्हायरल' प्रेमविवाहाचा हा असा कायदेशीर अंत होईल, याची कल्पना कुणीही केली नव्हती. आता पोलीस तपासात यामागील आणखी कोणते दुवे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.