Most Expensive Number Plate: आलिशान गाड्या, महागडे इंटीरियर आणि लक्झरी लाईफस्टाईल याबाबत अनेकांना आकर्षण असतं. पण भारतात एका कारच्या नंबर प्लेटसाठी तब्बल कोट्यवधी रुपये मोजले जातील, असं कुणाच्या स्वप्नातही नसेल. मात्र आंध्र प्रदेशातील एका तरुणाने हे अशक्य वाटणारं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. ‘DDC 0001’ या विशेष नंबर प्लेटसाठी त्याने तब्बल २ कोटी ८ लाख रुपयांची बोली लावत नवा विक्रम स्पष्ट केला आहे.
ही आतापर्यंतची भारतातील सर्वात महागडी कार नंबर प्लेट ठरली असून, सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ही नंबर प्लेट कोणत्याही लक्झरी कारला नाही, तर अवघ्या १० लाखांच्या मारुती सुझुकी इग्निस या कारला लावण्यात आली आहे. त्यामुळे “गाडी स्वस्त आणि नंबर महाग” अशी मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिली जात आहे.
हा भव्य लिलाव ‘बिग बॉय टॉईज’ या प्रसिद्ध ऑक्शन हाऊसकडून आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीपासूनच या नंबरसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेक श्रीमंत व्यावसायिक, कार कलेक्टर्स आणि व्हीआयपी लोकांनी या लिलावात सहभाग घेतला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील या तरुणाने सर्वांना मागे टाकत २.०८ कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली.
भारतामध्ये याआधीही ‘0001’ किंवा ‘VIP’ नंबरसाठी लाखो रुपयांची बोली लागल्याची उदाहरणं आहेत. काही ठिकाणी ५० ते ७० लाखांपर्यंतचे व्यवहार झाले आहेत. पण २ कोटींच्या पुढे जाणारी ही पहिलीच वेळ मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, एवढ्या रकमेत किमान दोन ते तीन लक्झरी कार जसं की मर्सिडीज, बीएमडब्ल्यू किंवा ऑडी सहज खरेदी करता येऊ शकल्या असत्या.
मग ‘DDC 0001’ मध्ये नेमकं काय खास आहे? ‘0001’ हा नंबर नेहमीच स्टेटस सिम्बॉल मानला जातो. कोणत्याही सिरीजमधील पहिला नंबर असणं म्हणजे प्रतिष्ठा, ओळख आणि वेगळेपणा. अनेक श्रीमंत लोकांसाठी ही केवळ हौस नसून एक प्रकारची गुंतवणूक देखील असते, असं मत काही ऑटो एक्सपर्ट्स व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या तरुणाच्या शौकीन वृत्तीचं कौतुक करत आहेत, तर काहीजण “ऐपत नसताना कोटींची बोली” अशा खोचक कमेंट्स करताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच एका लिलावात कोट्यवधींची बोली लावून नंतर पैसे देण्यास असमर्थ ठरल्याचं उदाहरणही चर्चेत आलं होतं.
एकूणच, ‘DDC 0001’ या नंबर प्लेटमुळे भारतातील व्हीआयपी नंबरचा क्रेझ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गाडी महाग असो वा स्वस्त, नंबर प्लेटच्या हौसेसाठी लोक कितीही खर्च करू शकतात, हे या घटनेतून पुन्हा सिद्ध झालं आहे.