Tuesday, February 17, 2026 07:35:50 PM

Nat Sciver Brunt: नेट सायव्हर-ब्रंटने इतिहास रचला! WPL मध्ये शतक झळकावणारी ठरली पहिली फलंदाज

WPL 2026 मध्ये नेट सायव्हर-ब्रंटने इतिहास रचत स्पर्धेतील पहिले शतक झळकावले. RCB विरुद्ध तिच्या नाबाद खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 199 धावांचा भक्कम स्कोअर उभारला.

nat sciver brunt नेट सायव्हर-ब्रंटने इतिहास रचला wpl मध्ये शतक झळकावणारी ठरली पहिली फलंदाज

WPL 2026: वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये वडोदऱ्याच्या कोटांबी स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींना ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अनुभवी अष्टपैलू खेळाडू नेट सायव्हर-ब्रंट हिने WPL च्या इतिहासातील पहिलेच शतक झळकावत नवा अध्याय लिहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या या सामन्यात तिच्या खेळीने संपूर्ण सामना उजळून निघाला.

सोमवारी झालेल्या या लढतीत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. संघाची सुरुवात फारशी प्रभावी न झाल्यानंतर नेट सायव्हर-ब्रंटने डाव सावरत आक्रमक पवित्रा घेतला. संयम आणि आक्रमकतेचा सुंदर समतोल साधत तिने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तिचा गिअरच बदलला आणि RCB च्या गोलंदाजांवर तिने चौकार-षटकारांचा वर्षाव सुरू केला.

१९व्या षटकात ५७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत सायव्हर-ब्रंटने इतिहास रचला. WPL मध्ये याआधी अनेक दिग्गज फलंदाज शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचून बाद झाले होते. याच स्पर्धेत स्मृती मंधाना आणि सोफी डिव्हाइन या खेळाडू ९० च्या पुढे जाऊनही शतक पूर्ण करू शकल्या नव्हत्या. मात्र नेटने ‘नर्व्हस नाइंटीज’चा अडसर पार करत तीन आकडी धावसंख्या गाठली.

तिने नाबाद १०० धावा करताना १६ चौकार आणि १ षटकार लगावला. तिच्या या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ४ बाद १९९ धावा असा भक्कम स्कोअर उभारला. डावानंतर बोलताना सायव्हर-ब्रंट म्हणाली की, ९० च्या आसपास बाद होणाऱ्या खेळाडूंची उदाहरणे डोळ्यासमोर होती, त्यामुळे शतक पूर्ण करण्याचा निर्धार होता. संघासाठी जास्तीत जास्त धावा करणे हाच उद्देश असल्याचे तिने सांगितले.

हे शतक सायव्हर-ब्रंटचे टी-२० क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. विशेष बाब म्हणजे तिची जोडीदार आणि माजी इंग्लंड क्रिकेटपटू कॅथरीन सायव्हर-ब्रंट स्टँडमध्ये उपस्थित होती. शतकानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता आणि प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.

RCB च्या गोलंदाजांना तिच्या फलंदाजीपुढे फारसे उत्तर सापडले नाही. राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, नादीन डी क्लर्क आणि लॉरेन बेल यांच्यावर तिने प्रभावी फटकेबाजी केली. मैदानाच्या चौफेर तिने फटके मारत RCB च्या रणनीती उद्ध्वस्त केल्या.

या ऐतिहासिक खेळीमुळे नेट सायव्हर-ब्रंट WPL मधील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज म्हणूनही अधिक भक्कम झाली आहे. तिचे हे शतक केवळ एका सामन्यापुरते मर्यादित न राहता, WPL च्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री