पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत ग्राहक निश्चिंत असतात. मात्र बंगळुरूमधील अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत समोर आलेल्या प्रकारामुळे या विश्वासाला धक्का बसला आहे. शहरातील थ्री स्टार आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये करण्यात आलेल्या तपासणीत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. काही ठिकाणी खाद्यपदार्थांची चुकीच्या पद्धतीने साठवणूक, मुदतबाह्य पदार्थ आणि बुरशी आलेल्या भाज्या आढळल्या. विशेष म्हणजे, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल 207 किलो खराब भाज्या, 32 लिटर दूध आणि सुमारे 250 किलो इतर खाद्यपदार्थ आढळून आले. यातील काही भाज्यांना मोठ्या प्रमाणात बुरशी लागल्याचेही तपासणीदरम्यान स्पष्ट झाले.
या कारवाईत हॉटेलच्या स्वयंपाकघरातील अस्वच्छतेचाही मुद्दा समोर आला. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची साठवणूक योग्य पद्धतीने करण्यात आलेली नव्हती. अनेक पदार्थ कित्येक दिवसांपासून साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. काही खाद्यपदार्थांच्या लेबलवर चुकीची माहिती असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याचे आढळल्याने अन्नसुरक्षेच्या नियमांकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. पंचतारांकित हॉटेलसारख्या ठिकाणी अशी परिस्थिती आढळल्याने तपासणी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाले.
दरम्यान, आरोग्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली अन्न व औषध प्रशासनाने बंगळुरूमध्ये मोठी तपासणी मोहीम राबवली. यासाठी अधिकाऱ्यांची 30 पथके तयार करण्यात आली होती. या पथकांकडून शहरातील 26 थ्री स्टार आणि पंचतारांकित हॉटेल्सची झाडाझडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान हळद पावडर, खाद्यतेल, चहा पावडर, टोमॅटो सॉस, लिंबाचा रस, काजू, पापड, मसाला पावडर, काळी मिरी तसेच विविध मांसाहारी पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे या नमुन्यांच्या अहवालानंतर आणखी काही धक्कादायक बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईनंतर आता इतर राज्यांमध्येही अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासन सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईची सध्या चर्चा होत असून, खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तुकाराम मुंडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दारूतील भेसळीबाबतही प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे अन्नपदार्थांनंतर आता भेसळयुक्त दारूविरोधातही कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.