Sunday, November 16, 2025 06:22:16 PM

Operation Blue Star Inside Story : 'ऑपरेशन ब्लु स्टार' राबवण्याचं 'हे' कारण माहित आहे का ?

पण ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं? त्यामुळे नेमकं काय घडलं? याबदद्ल आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

operation blue star inside story  ऑपरेशन ब्लु स्टार राबवण्याचं हे कारण माहित आहे का

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री पी.चिदंबरम यांच्या एका वक्तव्याने ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा चर्चेत आलं आहे. "तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा जो निर्णय घेतला तो चुकीचा होता. या चुकीची किंमत इंदिरा गांधी यांनीआपल्या जीवाने चुकवली", असं वक्तव्य पी.चिदंबरम यांनी खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात केलं. पण ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं? त्यामुळे नेमकं काय घडलं? याबदद्ल आता सविस्तरपणे जाणून घेऊया. 

जून 1984 मध्ये पंजाबच्या अमृतसरमधील शीख धर्मीयांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं गेलं. खलिस्तानांविरोधात ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनदरम्यान शेकडो सामान्य नागरिकांसह भारतीय जवानांचाही मृत्यू झाला होता. स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी पंजाबमध्ये हिंसा भडकली होती. ही हिंसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'ऑपरेशन ब्लू स्टार'ला हिरवा कंदिल दिला आणि कठोर निर्णय घेतले. शीख समुदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पवित्र सुवर्ण मंदिरात 'ऑपरेशन ब्लू स्टार'ची रक्तरंजित कारवाई झाली, यामुळे सुवर्ण मंदिराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यामुळे शीख समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता.

हेही वाचा - Housing Demand in India: भारतातील घरांची मागणी टिकून राहणार; PL कॅपिटल अहवालात खुलासा

'ऑपरेशन ब्लू स्टार' कसं घडलं? 

स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीदरम्यान वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर शिखांनी खलिस्तान नावाने वेगळ्या देशाची मागणी केली आणि ही मागणी जोर धरु लागली. फाळणीनंतर पंजाब प्रांत दोन देशांमध्ये विभागला, त्यामुळे शीख समाजाची महत्त्वाची पवित्र धर्मस्थळं आणि ठिकाणं पाकिस्तानात गेली. त्यानंतर शीख समुदायांमधील फुटीरतावाद्यांमध्ये खलिस्तान चळवळीला वेग आला. शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या खलिस्तानींनी स्वत:साठी वेगळे खलिस्तान राज्य निर्माण करण्याचा निर्धार पक्का केला. या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे नाव आघाडीवर होते. भिंद्रनवाले यांची प्रक्षोभक भाषणे आणि त्याचा तरुण शिखांवर पडणारा प्रभाव यामुळे पंजाबमधील राजकीय गणितं बिघडू लागली. 1984 मध्ये भिंद्रनवाले यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचा आसरा घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सगळ्या प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्याची निकड भासू लागली. फुटीरतावाद्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आलं.

संपूर्ण अमृतसरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.सुवर्ण मंदिराचं पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. संपूर्ण पंजाबमधील संपर्क आणि दळणवळण ठप्प झाले होते. भारतीय सैन्य आणि खलिस्तानी यांच्यात झालेल्या चकमकीत भिंद्रनवाले यांचाही मृत्यू झाला. कारवाईमध्ये एकूण 554 खलिस्तानींचा खात्मा करण्यात आला, तर 87 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले.ऑपरेशन ब्लू स्टार संपले पण त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीव गमवावा लागला. 31 ऑक्टोबर 1984 ऑपरेशन ब्लू स्टारच्या चारच महिन्यात 2 शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशभरात अस्थिरता माजली आणि देशाच्या इतिहासातील ते दिवस आजपर्यंत कोणीही विसरू शकलेलं नाही.


सम्बन्धित सामग्री