GST Collection: GST चा नवा रेकॉर्ड! एप्रिलमध्ये 2.43 लाख कोटींचा टप्पा पार, सरकारी तिजोरी मालामाल

मागील वर्षाच्या (एप्रिल 2025) 2.23 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये सुमारे 8.7 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

GST Collection: GST चा नवा रेकॉर्ड! एप्रिलमध्ये 2.43 लाख कोटींचा टप्पा पार, सरकारी तिजोरी मालामाल

GST Collection: एप्रिल 2026 हा महिना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. वस्तू आणि सेवा कराच्या (GST) संकलनाने आतापर्यंतचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले असून, सरकारी तिजोरीत 2.43 लाख कोटी रुपयांची विक्रमी रक्कम जमा झाली आहे. मागील वर्षाच्या (एप्रिल 2025) 2.23 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये सुमारे 8.7 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यातील 2 लाख कोटींच्या आकड्यापेक्षा एप्रिलमधील कामगिरी अत्यंत समाधानकारक राहिली असून, भारताच्या आर्थिक प्रगतीचे हे एक सकारात्मक निदर्शक मानले जात आहे.

आयातीचा महसुलात मोठा वाटा  
या वेळच्या विक्रमी जीएसटी संकलनामागे आयातीचा (Imports) मोलाचा वाटा राहिला आहे. आयातीशी संबंधित जीएसटी महसुलात 25.8 टक्केची जोरदार वाढ दिसून आली असून, हा आकडा 57,580 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या तुलनेत देशांतर्गत व्यावसायिक उलाढालीतून मिळणारा महसूल 4.3 टक्केच्या माफक दराने वाढून 1.85 लाख कोटी रुपये झाला आहे. ही आकडेवारी स्पष्ट करते की, एकूण कर संकलनाला गती देण्यात आयातीने इंजिनसारखी भूमिका बजावली आहे.

जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाचा परिणाम
जीएसटीच्या या आकडेवारीवर जागतिक भू-राजकीय घडामोडींचा स्पष्ट प्रभाव दिसून येत आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे एप्रिल महिन्यात 'ब्रेंट क्रूड' तेलाच्या किमतीने 126 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आयात अधिक महाग झाली, ज्याचा थेट परिणाम कर संकलनात वाढ होण्यात झाला. तथापि, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारला मिळालेला हा अतिरिक्त महसूल तिजोरीसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Rate Update: केंद्र सरकारचा इंधनावरील कराबाबत मोठा निर्णय; 1 मे पासून डिझेल निर्यातीवरील कर घटवला, पाहा काय आहेत नवे दर

परतावा (Refunds) आणि भविष्यातील आव्हाने
एप्रिल महिन्यात जीएसटी परताव्याच्या रकमेतही वाढ झाली आहे. एकूण परतावे 19.3 टक्क्यांने वाढून 31,793 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. यामध्ये देशांतर्गत परताव्यांमध्ये 54.6 टक्केची मोठी वाढ दिसून आली. दरम्यान, जीएसटी वाढीचा वेग किंचित मंदावत असल्याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. मार्चमधील 8.8 टक्केवरून हा वेग एप्रिलमध्ये 8.7 टक्केवर आला आहे. देशांतर्गत मागणीत सातत्य राहिल्यास आणि जागतिक परिस्थिती स्थिर झाल्यास आगामी काळातही जीएसटी संकलनाचा हा आलेख उंचावलेला राहील, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number