Delhi Blast Update: दिल्लीतील 10 नोव्हेंबरच्या भीषण बॉम्बस्फोटानंतर तपासाची सूत्रं आता मुंबईपर्यंत पोहोचली आहेत. लाल किला मेट्रो स्टेशनजवळ आय-20 कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना केंद्रीय एजन्सींनी मुंबई पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे.
मुंबईतून तीन संशयित ताब्यात
गुप्त माहितीनुसार, मुंबईच्या विविध भागांमधून तीन उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांवरून त्यांनी या प्रकरणाशी निगडित व्यक्तींशी संपर्क साधला होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर तिघांनाही दिल्लीला हलवण्यात आले असून, त्यांचा स्फोटाशी संभाव्य संबंध शोधण्यासाठी त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
विशिष्ट मोबाइल अॅप तपासाच्या केंद्रस्थानी
सूत्रांच्या माहितीनुसार, हे संशयित एका खास मोबाइल अॅपद्वारे मुख्य आरोपींशी संपर्कात होते. संवेदनशील माहितीची देवाणघेवाण किंवा समन्वय या अॅपद्वारे झाला असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या अॅपच्या डिजिटल ट्रेलचा अभ्यास करण्याचे काम तांत्रिक पथकांकडे सोपविण्यात आले आहे. केंद्रीय तपास संस्थांकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या प्रकरणी चौकशी सुरू आहेत. सुरक्षा यंत्रणांकडून स्फोटाशी संबंधित डिजिटल आणि आर्थिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे.
अल फलाह विद्यापीठावर कडक तपासणी
दरम्यान, या स्फोटानंतर फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठ दहशतवादी मॉड्यूलच्या संशयित केंद्रस्थानी आले आहे. विद्यापीठाशी संबंधित अनेक डॉक्टरांना अटक झाली असून, त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा संयुक्त तपास ED, इंटेलिजन्स एजन्सी आणि दिल्ली पोलीस करत आहेत. सरकारने विद्यापीठाच्या संपूर्ण नोंदींचे फॉरेन्सिक ऑडिटही आदेशित केले आहे. विद्यापीठातील परीक्षा सुरू असल्या तरी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. काही विद्यार्थ्यांनी कॅम्पस सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे, तर प्रशासन नियमित वर्ग आणि वसतिगृह सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.