Nirmala Sitharaman Budget Saree: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. बजेटमधील तरतुदी, करसवलती आणि आर्थिक धोरणांवर देशाचं लक्ष असतानाच, दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या साडीची विशेष चर्चा होत आहे. कारण ही साडी केवळ पोशाख नसून, त्यामागे एक भावनिक आणि कलात्मक कथा दडलेली आहे.
यंदा निर्मला सीतारमण यांनी क्रीम रंगाची साडी परिधान केली असून, तिच्यावर लाल रंगाचा उठावदार बॉर्डर आणि सूक्ष्म नक्षीकाम पाहायला मिळत आहे. या साडीचा थेट संबंध बिहारच्या प्रसिद्ध मधुबनी चित्रकलेशी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलाकार दुलारी देवी यांच्याशी जोडला जात आहे.
मधुबनी कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुलारी देवी यांनी ग्रामीण भारतातील लोककलेला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं मोठं काम केलं आहे. साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या दुलारी देवींच्या कलेला राष्ट्रीय ओळख मिळाली, ती त्यांच्या जिद्दीतून. 2021 साली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची त्यांच्याशी भेट झाली होती. त्या भेटीदरम्यान, दुलारी देवी यांनी स्वतःच्या हस्तकलेतून तयार केलेली एक खास साडी अर्थमंत्र्यांना भेट म्हणून दिली होती.
ही साडी केवळ कापड नाही, तर त्यावर काढलेली मधुबनी शैलीतील नक्षी भारतीय संस्कृती, स्त्रीशक्ती आणि ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवते. विशेष म्हणजे, त्या भेटीदरम्यान दुलारी देवी यांनी निर्मला सीतारमण यांना बजेट सादर करताना ही साडी परिधान करण्याची विनंती केली होती. याच भावनिक कनेक्शनमुळे यंदाच्या बजेटमध्ये ही साडी पुन्हा चर्चेत आली आहे.
दरवर्षी बजेटच्या दिवशी अर्थमंत्र्यांच्या साडीचा रंग, नक्षी आणि प्रकार यावरून विविध अर्थ लावले जातात. काहींच्या मते, साडीच्या रंगातून बजेटचा मूड आणि दिशा सूचित होते. क्रीम रंग शांतता, स्थैर्य आणि समतोल दर्शवतो, तर लाल रंग ऊर्जा, ताकद आणि निर्धाराचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे यंदाच्या बजेटकडून आर्थिक स्थैर्य आणि विकासाचा संदेश दिला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या अर्थसंकल्पासमोर अर्थमंत्र्यांसमोर अनेक आव्हानं उभी आहेत. महागाईवर नियंत्रण, मंदावलेली आर्थिक वाढ, रोजगारनिर्मिती, मध्यमवर्गाला दिलासा देणारी कररचना आणि विकासदर वाढवणे, ही पाच प्रमुख उद्दिष्टे बजेटमध्ये केंद्रस्थानी असणार आहेत.
आकड्यांपलीकडे पाहिलं, तर निर्मला सीतारमण यांची ही साडी ‘मेक इन इंडिया’, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन आणि भारतीय लोककलेच्या सन्मानाचं प्रतीक ठरत आहे. त्यामुळे यंदाचं बजेट केवळ आर्थिक दस्तऐवज न राहता, संस्कृती आणि संवेदनशीलतेचंही प्रतिनिधित्व करत असल्याचं चित्र दिसत आहे.