Bihar Flood Relief Donation: बिहारमधील भीषण पूरस्थितीमुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून बाधितांच्या मदतीसाठी राजकीय आणि सामाजिक स्तरावरून पुढाकार घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी संवेदनशीलतेचा परिचय देत बिहारमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून मिळणारे आपले सलग तीन महिन्यांचे पूर्ण वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’त जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही एकूण रक्कम सुमारे 6 लाख 35 हजार रुपये इतकी असून, शुक्रवारी त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे या निर्णयाची माहिती दिली. बिहारमधील जवळपास 50 लाख नागरिक सध्या पुराच्या तडाख्यात सापडले आहेत.
वैयक्तिक मानधनातून सामाजिक उत्तरदायित्व
मूळचे पाटण्याचे रहिवासी असलेले आणि बिहारमधूनच राज्यसभेत प्रतिनिधित्व करणारे नितीन नवीन यांनी केंद्र व राज्य सरकार पूरबाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बाधित भागात सातत्याने मदत आणि बचाव कार्य सुरू असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. बिहार सरकारने पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 7 हजार रुपयांचे तातडीचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या मदत योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल 550 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत बाधित क्षेत्रांमध्ये वैद्यकीय शिबांरे, मोफत कम्युनिटी किचन आणि जनावरांसाठी चाऱ्याची स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे.
केंद्राचे विशेष पथक पाहणीसाठी दाखल
दुसरीकडे, केंद्र सरकारकडूनही बिहारमधील नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जात आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने नुकताच बिहारमधील पूरग्रस्त भागांचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. पूर ओसरल्यानंतर शेती, घरे आणि पायाभूत सुविधांच्या झालेल्या नुकसानीचा सविस्तर वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार केला जाईल, ज्यासाठी केंद्राचे आणखी एक मूल्यांकन पथक लवकरच राज्याचा दौरा करेल, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.