Noida Cyber Fraud: उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये तब्बल 12 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या सेक्टर 47 मधील रहिवासी इंद्रपाल चौहान यांना गुंतवणुकीच्या आमिषाची भुरळ घालत मोठ्या रकमेचा गंडा घालण्यात आला. फसवणूक करणाऱ्यांनी शेवटी 17 कोटींची अतिरिक्त मागणी केल्यानंतर पीडितेला संशय आला आणि संपूर्ण फसवणुकीचा पर्दाफाश झाला.
व्हॉट्सअॅपवरून रचला सापळा
इंद्रपालला प्रथम कियारा शर्मा नावाच्या प्रोफाइलवरून एक व्हॉट्सअॅप संदेश आला. महिलेने संभाषण सुरू केले आणि नंतर त्याला गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने, पीडित व्यक्तीला सुंदरन एएमसी स्टे पॉझिटिव्ह आणि 11 सुंदर एएमसी इन्फिनिट पॉसिबिल या दोन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले गेले. ग्रुपमध्ये दाखवलेल्या बनावट नफ्याचे स्क्रीनशॉट वापरून पीडित व्यक्तीला फसवण्यात आले.
17 दिवसांत 12 कोटींचा गंडा
चौहान यांनी सुरुवातीला 50,000 गुंतवले. काही दिवसांतच फसवणूक करणाऱ्यांनी 9 लाख नफा काढून दाखवला, ज्यामुळे त्यांचा विश्वास अधिकच वाढला. पुढील 17 दिवसांत त्यांनी एकूण 11,99,50,000 रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. सगळे व्यवहार वेगवेगळ्या बँक खात्यांतून फिरवत गुन्हेगारांनी रक्कम गायब केली. यानंतर, Exato Technology Ltd. च्या बनावट आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्यांनी अजून 17 कोटी रुपये मागितले. याच क्षणी चौहान यांना फसवणुकीचा अंदाज आला.
हेही वाचा - Crime News: माता न तूच वैरिणी! गोंडस मूल दिसलं की पाण्यात बुडवून मारायची; स्वतःच्या मुलालाही सोडलं नाही
पोलिसांची तातडीने चौकशी सुरू
फसवणूक लक्षात येताच इंद्रपाल चौहान यांनी सेक्टर 36 सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली. सायबर क्राईम सेलने तपास सुरू केला असून विविध खात्यांचा मागोवा घेतला जात आहे. तसेच निधी गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक सायबर पोलीस पथकांची मदत घेण्यात येत आहे. पोलिसांना अंदाज आहे की, ही आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय सायबर गँग असू शकते.
हेही वाचा - Psycho Killer Poonam: 'तिने लग्नाआधी मुलांना मारलं…' सायको किलर पूनमच्या आईने केले थक्क करणारे खुलासे
सायबर तज्ज्ञांचा इशारा
अशा प्रकरणांमध्ये सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अज्ञात लिंक, ग्रुप किंवा गुंतवणूक सल्ल्यावर विश्वास ठेवू नका. अवास्तव नफ्याचे आश्वासन हे नेहमीच फसवणुकीचे पहिले लक्षण असते. तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच करा, असा सल्लाही सायबर तज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.