Monday, February 09, 2026 01:42:28 PM

NPS Scheme New Changes: पेन्शनसोबतच आता फ्री ट्रीटमेंट? NPS ची नवी 'आरोग्य पेन्शन' योजना; जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

या योजनेमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी एक स्वतंत्र आणि सुरक्षित निधी तयार करण्याची संधी मिळणार आहे.

nps scheme new changes पेन्शनसोबतच आता फ्री ट्रीटमेंट nps ची नवी आरोग्य पेन्शन योजना जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

नवी दिल्ली: वाढती महागाई आणि त्यासोबतच गगनाला भिडणारा वैद्यकीय खर्च ही सध्याच्या काळात सामान्य माणसासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब ठरत आहे. विशेषतः निवृत्तीनंतर जेव्हा उत्पन्नाचे स्रोत मर्यादित होतात, तेव्हा एखाद्या मोठ्या आजाराचा खर्च मध्यमवर्गीय कुटुंबाचे कंबरडे मोडतो. हीच अडचण ओळखून पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण या संस्थेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. 'म्हातारपणाची काठी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (NPS) आता 'एनपीएस आरोग्य पेन्शन' (NPS Swasthya Pension) या विशेष उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

काय आहे ही नवी योजना?

27 जानेवारी 2026 रोजी PFRDA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एनपीएस अंतर्गत ही एक विशेष 'सेक्टर स्कीम' म्हणून ओळखली जाईल. या योजनेचा मुख्य उद्देश पेन्शन बचतीला थेट आरोग्य खर्चाशी जोडणे हा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, आता तुमची NPS मधील गुंतवणूक केवळ भविष्यातील मासिक पेन्शनसाठीच नाही, तर निवृत्तीनंतरच्या रुग्णालयाची बिले, डॉक्टरांची फी आणि औषधांच्या खर्चासाठी देखील वापरता येणार आहे.

बचतीचा दुहेरी फायदा

या योजनेमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी एक स्वतंत्र आणि सुरक्षित निधी तयार करण्याची संधी मिळणार आहे. सध्या हा प्रकल्प 'पायलट प्रोजेक्ट' म्हणून 'रेग्युलेटरी सँडबॉक्स' अंतर्गत चाचणीच्या टप्प्यावर आहे. म्हणजेच, सुरुवातीला काही निवडक स्तरावर याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्यानंतर ती संपूर्ण देशभर लागू केली जाणार आहे. "आरोग्यसेवा सुलभ, पारदर्शक आणि सुरक्षित" करणे हे या योजनेचे प्रमुख सूत्र आहे.

हेही वाचा: Banned Biostimulants in Maharashtra: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, तुम्ही सुद्धा 'ही' जैव उत्तेजकं वापरता का? राज्य सरकारचा मोठा निर्णय

पैसे काढण्याचे नियम काय आहेत  

एनपीएस आरोग्य पेन्शन योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सहज नियम. या योजनेचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत:

किमान मर्यादा: तुमच्या खात्यात किमान 50,000 रुपये जमा झाल्यानंतरच तुम्ही वैद्यकीय खर्चासाठी पहिली आंशिक रक्कम काढू शकता.

विड्रॉवल मर्यादा: सभासद त्यांच्या स्वतःच्या योगदानाच्या रकमेच्या जास्तीत जास्त 25 टक्के रक्कम कोणत्याही वेळी काढू शकतात.

निर्बंधांशिवाय सुविधा: या योजनेत पैसे काढण्याच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही, तसेच यासाठी कोणताही 'वेटिंग पिरियड' (प्रतीक्षा कालावधी) ठेवण्यात आलेला नाही.

गंभीर आजारांसाठी विशेष तरतूद: जर रुग्णालयाचा खर्च जमा पुंजीच्या 70 टक्के पेक्षा जास्त असेल, तर 100 टक्के रक्कम काढण्याची परवानगी देखील विशिष्ट परिस्थितीत मिळू शकते.

सहभागासाठी अटी काय?
ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणताही भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतो. जर तुमच्याकडे आधीच एनपीएसचे 'कॉमन स्कीम' खाते नसेल, तर आरोग्य पेन्शन खाते उघडताना ते उघडणे अनिवार्य आहे. तसेच, 40 वर्षांवरील सदस्य (शासकीय कर्मचारी वगळता) त्यांच्या मुख्य खात्यातील रकमेचा काही हिस्सा या आरोग्य खात्यात वर्ग करू शकतात.

थोडक्यात सांगायचे तर, "आजची छोटी बचत, उद्याच्या आजारपणातील मोठे संकट टाळण्यास मदत करेल." पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचा हा पुढाकार मध्यमवर्गीयांना निवृत्तीनंतरच्या 'मेडिकल बिला'च्या धसक्यातून मुक्त करण्यासाठी एक महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे.

हेही वाचा: Ajit Pawar's Plane Crash: मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान आग; अपघाताची भीषण दृश्य समोर


सम्बन्धित सामग्री