नवी दिल्ली: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. मात्र, सुरुवातीला पाश्चात्य देशांच्या वर्तमानपत्रांना पाकिस्तानचे मुखपत्र वाटत होते. इतकंच नाही, तर ते भारताबद्दल हास्यास्पद दावे करत होते. परंतु, सध्या खोट्याचे ढग हळूहळू दूर होत आहेत. तसेच, अमेरिकेतील वर्तमानपत्रे देखील आता सत्य स्वीकारायला सुरुवात केली आहे.
न्यूयॉर्क टाईम्सनंतर आता वॉशिंग्टन पोस्टनेही मान्य केले आहे की भारतीय हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तान सतत खोटे दावे करत होते की, 'पाकिस्तानने भारतावर प्राणघातक हल्ले केले आहेत आणि भारताचे बरेच नुकसान केले आहे'. पण पाश्चात्य देशांमधील माध्यमांनी आता सक्तीने सत्य लिहिण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा: ऑपरेशन सिंदूरपूर्वी मोदींनी घेतल्या 45 गुप्त बैठका
पाकड्यांचा खोटा दावा:
यापूर्वी, पाकड्यांनी भारतातील अनेक हवाई तळांवर हल्ला केल्याचा खोटा दावा केला होता. 'भारतीय संरक्षण प्रणाली S-400 उडवली गेली आहे, अनेक लढाऊ विमाने पाडली गेली आहेत, दिल्लीवर हल्ला झाला आहे', असे दावे पाकिस्तानी माध्यमांनी नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले आहेत. मात्र, वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, भारताने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि पाकिस्तानी हवाई संरक्षण भारतीय हल्ले रोखण्यात अपयशी ठरले आहे.
भारताची ताकद जगाने केली मान्य:
वॉशिंग्टन पोस्टने उपग्रहाचे फोटो आणि इतर पुरावे देऊन तज्ञांचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये ते म्हटले की, 'शनिवारी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये किमान सहा हवाई तळांवरील धावपट्ट्या आणि संरचनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दशकांच्या संघर्षातील हा दक्षिण आशियातील प्रतिस्पर्ध्यांमधील सर्वात मोठा हल्ला आहे', असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढे वॉशिंग्टन पोस्टने लिहिले की, 'दोन डझनहून अधिक उपग्रहाचे फोटो आणि त्यानंतरच्या व्हिडिओंच्या पुनरावलोकनात असे आढळून आले की हल्ल्यांमुळे हवाई दलाने वापरलेल्या तीन हँगर, दोन धावपट्ट्या आणि दोन मोबाइल इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने लक्ष्य केलेली काही ठिकाणे पाकिस्तानच्या आत 100 मैलांपर्यंत होती'.