नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या हवाई दलाने (Indian Air Force) पाकिस्तानातील पीओके आणि दहशतवादी तळ उध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. यासोबतच, भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती.
विशेष म्हणजे, बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी या ऑपरेशनबद्दल माहिती दिली. त्यापैकी एक म्हणजे सोफिया कुरेशी तर दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग होत्या. या पत्रकार परिषदेनंतर, सोफियाच्या आई, वडील आणि भावाने आनंद व्यक्त केला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कोणती अचूक शस्त्रे वापरली? जाणून घ्या
काय म्हणाली सोफियाची आई?
'माझ्या मुलीने आपल्या देशासाठी, हिंदुस्थानासाठी जे केलं आहे त्याचा मला खूप आनंद आहे. याचप्रकारे तिने पुढे जावं, तसंच इतरांनी आपल्या मुलींना शिकवावं, समृद्ध करावं. त्यांना चांगलं शिक्षण द्या, जेणेकरुन त्या माझ्या मुलीप्रमाणे सैन्यदलात अधिकारी होतील आणि देशासाठी काहीतरी करू शकतील. प्रत्येक घरातली एक मुलगी आणि एक मुलगा सैन्यात गेला पाहिजे असं मला वाटतं. सोफिया जेव्हा लहान होती, तेव्हा तिची आजी तिला गोष्टी सांगायची. 'तुझे आजोबा लष्करात आहेत', असे किस्से आजी सोफियाला सांगत असे. सोफिया आणि तिची बहीण खेळण्यातली बंदूकही खेळायची. ती मोठी झाली, तिचं शिक्षण झाल्यावर तिने सांगितलं की मला लष्करात जायचं आहे. आम्ही तिला 'जा' म्हटलं. एअर स्ट्राईकच्या आधी सोफियाने फक्त इतकंच म्हणाले होते, 'आमच्यासाठी दुवा कर'. काय होणार आहे ते आम्हालाही माहीत नव्हतं. दोन दिवसांपूर्वी तिने इतकंच म्हटले होते, 'आमच्यासाठी दुवा कर, बस.' इतकंच बोलणं झालं. पुढे काय होणार? ते आम्हालाही माहीत नव्हतं,' अशी भावनिक प्रतिक्रिया सोफिया कुरेशी यांची आई हलिमा यांनी दिली.
सोफिया कुरेशींच्या भावाची आणि वडिलांची भावनिक प्रतिक्रिया:
'आज मी टीव्ही बघत होतो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं, अरे ही तर माझी बहीण सोफिया आहे. तिने पाकिस्तानला कसा धडा शिकवला ते ऐकलं, तेव्हा वाटलं की आता हिशोब बरोबर झाला आणि गर्वाने आमची छाती फुलून आली,' अशी प्रतिक्रिया सोफियाच्या भावाने दिली. 'देशासाठी प्राण पणाला लावण्याचा क्षण हा कुठल्याही सैनिकासाठी मोलाचा असतो. त्यापेक्षा मोलाचा क्षण त्याच्या आयुष्यात नसतो. आपल्या देशासाठी माझ्या मुलीने जे केलं ते पाहून अभिमानाने माझी छाती फुलून आली. मला खूप अभिमान आहे माझ्या मुलीचा,' अशी भावनिक प्रतिक्रिया सोफिया कुरेशींच्या वडिलांनी दिली.