Budgam Encounter: जम्मू-काश्मीरच्या बुडगाम जिल्ह्यातील पालमैदान भागात सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान लष्कर-ए-तोयबा (LeT) चा धोकादायक दहशतवादी मोहम्मद आसिफ ऊर्फ हाशिम मुसा याचा मृतदेह आणि मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने या मोहिमेतील यशाची अधिकृत पुष्टी केली आहे. मारला गेलेला दहशतवादी हाशिम मुसा पाकिस्तानच्या अत्यंत प्रशिक्षित ‘स्पेशल सर्व्हिस ग्रुप’ (SSG) चा माजी पॅरा-कमांडो होता, जो भारतात घुसखोरी करून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाला होता.
लष्कराचे ‘ऑपरेशन कोराग’ आणि चकमक
मिळालेल्या अचूक आणि गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी मंगळवारी रात्री उशिरा युसमार्ग परिसरात ‘ऑपरेशन कोराग’ सुरू केले. या मोहिमेदरम्यान सतर्क जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. जवानांनी लपलेल्या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आव्हान दिले असता, त्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. लष्कराने दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात आणि झालेल्या जोरदार चकमकीत हाशिम मुसा ठार झाला. या परिसरात आणखी काही दहशतवादी असण्याची शक्यता गृहीत धरून सुरक्षा दलांची व्यापक शोधमोहीम अजूनही सुरूच आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि 20 लाखांचे बक्षीस
वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी हाशिम मुसा एक होता. या दुर्दैवी हल्ल्यात एका स्थानिक तरुणासह तब्बल 26 नागरिकांचा जीव गेला होता. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानी नागरिक आणि लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आदिल हुसेन ठोकर, अली भाई आणि हाशिम मुसा यांची माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
हेही वाचा – राजकीय वर्तुळात खळबळ! माजी मुख्यमंत्री करणार काँग्रेसमध्ये प्रवेश; हालचालींना वेग, भाजपची चिंता वाढली
एनआयएकडून 1,597 पानांचे आरोपपत्र दाखल
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी सात आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि तिची संलग्न संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) यांचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले आहे. एनआयएने आपल्या 1,597 पानांच्या या सविस्तर आरोपपत्रात पहलगाम हल्ल्यातील पाकिस्तानचे कटकारस्थान, नियोजन आणि मदतीचा पूर्ण पर्दाफाश केला आहे. यासोबतच पाकिस्तानी हँडलर साजिद जट्ट यालाही या मुख्य कटातील आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे.