Sunday, July 13, 2025 10:58:46 AM

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील जखमींची पंतप्रधानांनी घेतली भेट

अहमदाबादमध्ये झालेल्या दुःखद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादला भेट दिली.

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील जखमींची पंतप्रधानांनी घेतली भेट

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये झालेल्या दुःखद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादला भेट दिली. या दुर्घटनेत अनेक प्रवाश्यांनी जीव गमावला आहे. पीडित कुटुंबांसोबत असल्याची भावना व्यक्त करताना मोदी यांनी या घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेतली. या अपघातात बचावलेल्या एकमेव व्यक्तीचाही यात समावेश होता. या कठीण काळात देशाच्या अतूट पाठिंब्याचे आश्वासन पंतप्रधानांनी  दिले. सध्या सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठकही झाली.  

पंतप्रधान मोदींची एक्स पोस्ट
अहमदाबादमधील दुःखद विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली, ज्यात एकमेव वाचलेली व्यक्ती देखील होती आणि त्यांना आश्वासन दिले की या कठीण काळात आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. त्यांनी लवकर बरे होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे असे नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. 

हेही वाचा : Ahmedabad Plane Crash: आमदार महेश बालदींकडून मैथिलीच्या कुटुंबाचं सांत्वन

अहमदाबादमधील दुःखद विमान अपघातात झालेल्या मोठ्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांच्या अपार वेदना आणि हानी याबद्दल दुःख व्यक्त करून मोदी यांनी आपल्या सहवेदना शोकाकुल कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. तत्पूर्वी सकाळी मोदी यांनी अहमदाबादमधल्या अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. आपत्तीनंतर अथक परिश्रम करत असलेल्या अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांची भेट घेतली.

अहमदाबादमधील हवाई दुर्घटनेचा आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. इतक्या क्षणार्धात आणि हृदयद्रावकरित्या एवढे जीव गमावण्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांचे दुःख आणि त्यांच्या आयुष्यात भरून न येणारी पोकळी समजू शकतो. ओम शांती असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे. तसेच अहमदाबादमधल्या दुर्घटनास्थळाला आज भेट दिली. विनाशकारी दृश्य दुःखद आहे. आपत्तीनंतर अथक परिश्रम करत असलेल्या अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांची भेट घेतली. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत आमच्या संवेदना कायम असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री