पश्चिम बंगालच्या राजकीय क्षितिजावर आज एका नव्या अध्यायाची आणि ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली. 'कमळ' फुलल्याच्या आनंदात संपूर्ण बंगाल जणू भगवामय झाला असून, विजयाचा हाच अभूतपूर्व जल्लोष आजच्या भव्य शपथविधी सोहळ्यातही पाहायला मिळाला. एकीकडे सत्तांतराचे वेगवान वारे आणि दुसरीकडे देशभरातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी, अशा भारावलेल्या वातावरणात पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी आज राज्याची धुरा हाती घेतली. या राजकीय महासंग्रामाच्या यशस्वी सांगतेचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देशातील भाजप आणि मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी या ऐतिहासिक मंचावर हजेरी लावली होती.
या दिमाखदार सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती होती. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम अमित शाह यांना अत्यंत आदराने अभिवादन केले. राजकारणातील या नव्या पर्वाला शुभेच्छा देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पुढे येत अधिकारी यांच्या गळ्यात सन्मानाने भगवे उपरणे घातले. या एका कृतीने मंचावरील उत्साह अधिकच द्विगुणित झाला आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या राष्ट्रीय पातळीवरील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातूनही दिग्गज नेत्यांची फौज बंगालमध्ये पोहोचली होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावत मंचावर महाराष्ट्राचे दमदार प्रतिनिधीत्व केले. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी गजबजलेला हा मंच जणू देशाच्या राजकीय शक्तीचे आणि एकजुटीचे नवे केंद्र बनल्याचा भास निर्माण करत होता.
हेही वाचा: West Bengal Oath Ceremony: पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर! सुवेंदू अधिकारींनी स्वीकारली मुख्यमंत्रीपदाची धुरा; 'या' दिग्गज मंत्र्यांचाही शपथविधी
मात्र, या संपूर्ण भव्य-दिव्य सोहळ्यात संपूर्ण देशाचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतले ते एका अत्यंत खास आणि अनौपचारिक क्षणाने! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर आगमन होताच उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली. पंतप्रधान मोदी मंचावरील प्रत्येक नेत्यापाशी थांबत, अत्यंत नम्रपणे सर्वांना अभिवादन करत पुढे जात होते. परंतु, जेव्हा पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आले, तेव्हा त्यांची पावले तिथेच थबकली. नेहमीच्या औपचारिकतेपलीकडे जाऊन मोदींनी चक्क एकनाथ शिंदे यांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यास सुरुवात केली.
इतर नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान मोदींनी शिंदेंसोबत मंचावर सर्वाधिक वेळ व्यतीत केला. अत्यंत आपुलकीने विचारपूस करताना मोदींनी असे काहीतरी मार्मिक भाष्य केले की, एकनाथ शिंदे यांना त्याचे हसू आवरता आले नाही आणि ते मनमोकळेपणाने हसू लागले. राजकारणाच्या या अत्यंत शिस्तबद्ध आणि गंभीर मंचावर देशाच्या पंतप्रधानांसोबतची ही निखळ मैत्री उपस्थितांसाठीही कुतूहलाचा विषय ठरली. बराच वेळ हा संवाद रंगल्यानंतर पंतप्रधान मोदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून पुढे मार्गस्थ झाले.
सध्या राजकारणात रोज नव्या घडामोडी घडत असताना, मोदी आणि शिंदे यांच्यातील या मनमोकळ्या भेटीची आणि त्यांच्यातील राजकीय 'केमिस्ट्री'ची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. शपथविधी सुवेंदू अधिकारींचा असला, तरी इंटरनेटवर मात्र मोदी-शिंदेंच्या 'त्या' हास्याची आणि हस्तांदोलनाचीच सर्वाधिक मोहिनी पाहायला मिळत आहे. या एका भेटीने आगामी राजकीय समीकरणांचे अनेक छुपे संकेत दिल्याचीही कुजबूज आता राजकीय आणि माध्यमांच्या वर्तुळात रंगू लागली आहे.
हेही वाचा: Share Market Open: सणवार नाही तरीही शेअर मार्केट शनिवारी सुरू, नेमकं कारण काय?