सोमनाथ (गुजरात): बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मानल्या जाणाऱ्या प्रभास पाटन येथील श्री सोमनाथ मंदिरात आज, 11 मे 2026 रोजी एक सुवर्ण इतिहास लिहिला जाणार आहे. मंदिराच्या पुनर्निर्माण आणि प्राणप्रतिष्ठापनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'सोमनाथ अमृत पर्व' हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मंगल प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार असून, मंदिराच्या 90 मीटर उंच शिखरावर होणाऱ्या पहिल्या ऐतिहासिक 'कुंभाभिषेक' सोहळ्याचे ते साक्षीदार होतील.
11 पवित्र तीर्थांचे जल आणि वैदिक मंत्रजागर
या अमृत पर्वाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराच्या भव्य शिखरावर होणारा कुंभाभिषेक. हा विधी संपन्न करण्यासाठी देशातील 11 पवित्र तीर्थक्षेत्रांतून जल आणण्यात आले आहे. एका विशेष विशाल कलशामध्ये हे पवित्र जल भरून, अत्यंत शुभ मुहूर्तावर आणि वैदिक मंत्रांच्या घोषात हा अभिषेक केला जाणार आहे. मंदिराची उंची पाहता, विशाल क्रेनच्या साहाय्याने हा कलश 90 मीटर उंचीवर नेला जाईल, जिथे विद्वान पंडितांच्या हस्ते विधीवत पूजन पार पडेल.
काय आहे कुंभाभिषेकाचे आध्यात्मिक महत्त्व?
हिंदू धर्मशास्त्रात कुंभाभिषेक हा मंदिराच्या उर्जेला पुनरुज्जीवित करणारा अत्यंत पवित्र विधी मानला जातो. विशेषतः दक्षिण भारतात ही परंपरा अधिक प्रचलित आहे, मात्र सोमनाथ मंदिराच्या शिखरावर असा आयोजन पहिल्यांदाच होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, कुंभाभिषेकामुळे मंदिरातील दैवी चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी वाढते, ज्याचा लाभ दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना मिळतो.
हेही वाचा: Illegal Schools In Maharashtra : मुंबई - पुण्यासह राज्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, 76 शाळा बंद, तर 111 शाळांवर FIR दाखल; शिक्षण विभागाची धडक कारवाई
सरदार पटेलांचा संकल्प आणि 75 वर्षांचा प्रवास
सोमनाथ मंदिराचा इतिहास हा संघर्षाचा आणि विजयाचा इतिहास आहे. परकीय आक्रमकांनी अनेकदा हे मंदिर उद्ध्वस्त केले, परंतु प्रत्येक वेळी भाविकांच्या श्रद्धेतून ते पुन्हा उभे राहिले. स्वातंत्र्यानंतर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराच्या पुनर्निर्माणाचा ऐतिहासिक संकल्प सोडला होता. त्यानंतर 11 मे 1951 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती. आज त्याच ऐतिहासिक दिवसाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
अमृत सोहळ्यासाठी भक्तांची मांदियाळी
आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक सोमनाथमध्ये दाखल झाले आहेत. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी आणि रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. ऋग्वेद काळापासून संदर्भ असलेल्या या पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या गौरवगाथेत आजचा 'कुंभाभिषेक' एक नवा अध्याय जोडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमुळे आणि सुरक्षेच्या चोख बंदोबस्तात हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
हेही वाचा: Nitesh Rane: 'AIMIM ही दहशतवादी संघटना, तर ओवैसी म्हणजे लादेन'; भाजप मंत्री नितेश राणेंची जहरी टीका