नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीमध्ये इमर्जिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (ESTIC) 2025 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी एक लाख कोटी रुपयांच्या ‘रिसर्च, डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन (RDI) फंड’ योजनेची घोषणा केली. या फंडाचा उद्देश देशातील वैज्ञानिक संशोधन, तांत्रिक प्रगती आणि नवोन्मेष क्षमतांना बळकटी देणे आहे. मोदी यांनी सांगितले की हा उपक्रम भारताला जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर नेईल. कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा कार्यक्रम विज्ञानावर केंद्रित आहे, पण त्याआधी मी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाचा उल्लेख करणार आहे. आपल्या मुलींनी संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा पराक्रम केला आहे. त्यांच्या विजयाने भारताचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.” त्यांनी महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, हा विजय नव्या भारताच्या सशक्ततेचे प्रतीक आहे.
पंतप्रधानांनी पुढे इस्रोच्या अलीकडील यशाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले, “काल इस्रोने GSAT-7R (CMS-03) कम्युनिकेशन सॅटेलाइट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला, जो भारतीय नौदलासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मोहिमेत योगदान देणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचे मी अभिनंदन करतो. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासाठी आणखी एक ऐतिहासिक दिवस आहे. नव्या संशोधन आणि नवकल्पनांवर चर्चा व्हावी, या हेतूने या कॉन्क्लेव्हची संकल्पना करण्यात आली आहे.” मोदी म्हणाले की, “विज्ञानातील बदलाची गती आता रेषात्मक (Linear) नसून घातांकीय (Exponential) झाली आहे. म्हणूनच संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक लाख कोटी रुपयांचा RDI फंड सुरू केला आहे. हा फंड फक्त सरकारी संस्थांसाठीच नव्हे, तर खासगी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देण्यासाठीही उपयोगी ठरेल.”
हेही वाचा: Gold Price Today: सोने –चांदीच्या भावात घट सुरूच! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना सुखद धक्का; आजचे भाव जाणून घ्या
त्यांनी पुढे सांगितले की, “आमचे उद्दिष्ट म्हणजे ‘रिसर्च करणे सुलभ व्हावे’ यावर लक्ष केंद्रीत करणे. म्हणूनच आम्ही आर्थिक नियम आणि खरेदी प्रक्रियेत बदल करून वैज्ञानिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे.” Emerging Science, Technology and Innovation Conclave (ESTIC) 2025 ही कॉन्क्लेव्ह 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली गेली असून, यात शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग, सरकार, नोबेल पारितोषिक विजेते, वैज्ञानिक आणि धोरणनिर्माते सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञान आणि उद्योग क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून जागतिक स्तरावर भारताची तांत्रिक ओळख बळकट करणे आहे. हा कॉन्क्लेव्ह 11 महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित आहे. अॅडव्हान्स मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायो-मॅन्युफॅक्चरिंग, ब्ल्यू इकॉनॉमी, डिजिटल कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादन, कृषी तंत्रज्ञान, ऊर्जा, पर्यावरण आणि हवामान, आरोग्य व वैद्यकीय तंत्रज्ञान, क्वांटम सायन्स आणि अवकाश तंत्रज्ञान. या सर्व क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि भारताला ‘इनोव्हेशन सुपरपॉवर’ बनवणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे. पंतप्रधान मोदींनी शेवटी सांगितले की, विज्ञान आणि संशोधन ही केवळ प्रयोगशाळेपुरती मर्यादित गोष्ट राहू नये, तर ती प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा भाग बनली पाहिजे. त्यांच्या मते, "भारताचे उज्ज्वल भविष्य विज्ञानावर आधारित आहे, आणि या नव्या उपक्रमांमुळे देश नव्या उंचीवर पोहोचेल."
हेही वाचा: Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप! 10 जणांचा मृत्यू, 150 जखमी