देशात कॉक्रोज जनता पार्टीचे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन चांगलेच पेटले आहे. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस नीट पेपरफुटी प्रकरणावर गाजत आहे. अशातच पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाच्या बैठकीत नीट पेपरफुटी प्रकरणावर भाष्य केले आहे. अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली. यावेळ मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, ‘नीट परीक्षेच्या पेपरफुटीवरून निर्माण झालेल्या चितेच्या पार्श्वभूमीवर सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत म्हटले आहे.
यावेळी नीट परीक्षेसंदर्भात पंतप्रधान म्हणाले की, “आज एनडीए संसदीय पक्षाची बैठक पार पडली, जिला आता ‘मंगल मिलन’ म्हटले जाते. आम्ही नितीन नवीनजी यांच्यासह आमच्या नवीन राज्यसभा खासदाराचे स्वागत केले. ही बैठक फलदायी ठरली. आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत. पेपरफुटीत सहभागी असलेल्यांवर सर्वोच्च वकिलांच्या सल्ल्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. पेपरफुटी हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे आणि त्याचे राजकारण होता कामा नये. केवळ केंद्रानेच नव्हे, तर जिथे जिथे पेपरफुटी होते, त्या राज्यांनीही कठोर कारवाई केली पाहिजे. या प्रकरणात जे लोक सहभागी होते, त्यांना अटक केले आहे. आतापर्यंत 13 लोकांना अटक करण्यात आली आहे.”
“जो लोक जबाबदार आहेत, त्यांच्यावर सर्वात कठोर कारवाई केली गेली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कुणीही असे करण्याचे धाडस करणार नाही. जबाबदार लोकांना पकडल्यानंतर सरकारने पुन्हा परीक्षा घेतली आहे. पेपरफुटी प्रकरण हे भयंकर पाप आहे. पेपरफुटीच्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी सर्व राज्यांनी एकत्रित मिळून काम करायला हवे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीकडे हलकेपणाने पाहिले जाऊ शकत नाही. भविष्यात पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी परीक्षा प्रणाली अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे.” नीट-यूजी 2026 च्या पेपरफुटीविरोधात सुरु असलेले सीजेपीचे आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झाल्यानंतर रिजिजू यांनी पंतप्रधान बैठकीत काय म्हणाले याची माहिती दिली.