Rahul Gandhi: निवडणूक नव्हे ही तर ‘मतांची चोरी’! राहुल गांधींचा भाजपवर आरोप; म्हणाले, ‘हरियाणात तर…’

भाजपवर मतांच्या चोरीचे गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Rahul Gandhi: निवडणूक नव्हे ही तर ‘मतांची चोरी’! राहुल गांधींचा भाजपवर आरोप; म्हणाले, ‘हरियाणात तर…’

नवी दिल्ली: भाजपवर थेट ‘मतांच्या चोरीचा’ गंभीर आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, देशात सध्या केवळ काही जागाच नाही, तर कधीकधी संपूर्ण सरकारेच गैरमार्गाने आणि फेरफार करून पळवली जात आहेत. 2024 मध्ये काँग्रेसला विजयाची मोठी आशा असतानाही हरियाणात भाजपने अनपेक्षितपणे सत्ता मिळवली होती. यावर सडकून टीका करताना राहुल गांधी यांनी हरियाणातील भाजप सरकारला चक्क ‘घुसखोरांचे सरकार’ असे संबोधले आहे. भाजपने केवळ यंत्रणांमधील फेरफार आणि चलाखीच्या जोरावरच ही सत्ता मिळवली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

बंगाल आणि आसाममधील निकालांवरून संताप

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून राहुल गांधींनी भाजपला आणि निवडणूक प्रक्रियेला चांगलेच धारेवर धरले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने सत्ता मिळवल्याच्या दोनच दिवसांनंतर त्यांनी हा संताप व्यक्त केला. या निवडणुका म्हणजे ‘मतांची चोरी’ असल्याचे स्पष्ट उदाहरण आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये विचारले आहे की, “लोकसभेतील भाजपच्या 240 खासदारांपैकी जवळपास प्रत्येक सहावा खासदार हा मतांची चोरी करून निवडून आला आहे. त्यांना ओळखणे फारसे कठीण नाही, मग भाजपच्याच भाषेत सांगायचे तर आपण त्यांना ‘घुसखोर’ म्हणायचे का? आणि हरियाणात तर संपूर्ण सरकारच घुसखोर आहे.”

संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह

मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रिया हाताळणाऱ्या देशातील महत्त्वाच्या संस्थांवर केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण असल्याचा धक्कादायक आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. यावर बोलताना ते म्हणाले, “ज्या संस्था मतदार याद्यांमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेत फेरफार करतात, त्या संस्थाच आता सत्ताधाऱ्यांच्या खिशात आहेत. या सर्व संस्था पूर्णपणे ‘रिमोट कंट्रोल’वर चालवल्या जात आहेत.” भाजप ‘सत्याला’ घाबरत असून, जर देशात खऱ्या अर्थाने आणि पारदर्शकपणे निष्पक्ष निवडणुका झाल्या, तर भाजपला 140 जागाही जिंकता येणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: West Bengal Election: पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेची सगळी सूत्र गृहमंत्री अमित शाहांकडे; भाजपची महा-रणनीती, मुख्यमंत्रीपदाचा ‘सस्पेन्स’ वाढला

‘बंगालमध्ये 100 हून अधिक जागा चोरल्या’

बंगाल आणि आसामच्या निवडणूक निकालांवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच बोट ठेवले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने या राज्यांमधील निवडणुका चोरल्याचा थेट आरोप त्यांनी केला. “आम्ही ममताजींच्या मताशी पूर्णपणे सहमत आहोत. बंगालमध्ये चक्क 100 हून अधिक जागा चोरण्यात आल्या आहेत,” असे राहुल गांधी म्हणाले. हाच प्रकार यापूर्वी मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही आपल्याला पाहायला मिळाला होता, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

विधानसभेतील पक्षीय बलाबल आणि सद्यस्थिती

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी तब्बल 207 जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपने तृणमूल काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले आहे. तर दुसरीकडे, ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसला इथे स्वतंत्रपणे लढून केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. आसाममध्येही भाजपने 82 जागा जिंकत सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. तिथे काँग्रेसला फक्त 19 जागा जिंकता आल्या असून, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या रायजोर दल या पक्षाच्या पारड्यात केवळ दोन जागा पडल्या आहेत. या सर्व राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी केलेले हे गंभीर आरोप भारतीय राजकारणात मोठे वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: Keshav Upadhye: ईव्हीएमचे रडगाणे आता का बंद? केशव उपाध्ये यांनी विरोधकांना धारेवर धरलं; दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number