नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणामधील निवडणुकांवर गंभीर आरोप करत मतदार याद्यांमधील फसवणुकीचा मुद्दा उचलला आहे. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला की, हरियाणामध्ये सुमारे 25 लाख बनावट मतदार आहेत आणि प्रत्येक आठव्या मतदारामध्ये एक मतदार फसवा आहे. राहुल गांधींनी हे उघड करताना सांगितले की, त्यांच्या हातात या संपूर्ण प्रकरणाचे ठोस पुरावे आहेत. राहुल गांधी म्हणाले, “आमच्याकडे ‘एच फाइल्स’ आहेत, ज्यातून स्पष्ट होते की कशा प्रकारे संपूर्ण राज्यच चोरले गेले आहे. हे केवळ एखाद्या मतदारसंघापुरते मर्यादित नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही घडत आहे. हरियाणातील आमच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या की काहीतरी बिनसलं आहे.”
त्यांनी सांगितले की काँग्रेसने पूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्येही अशाच प्रकारच्या तक्रारी अनुभवल्या होत्या. “मात्र, आम्ही हरियाणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि तिथं काय घडलं हे सखोलपणे तपासलं,” असं राहुल गांधींनी सांगितलं. काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, “सर्व एग्झिट पोल्समध्ये हरियाणात काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र निकाल पूर्णतः उलट आले. सर्वात धक्कादायक म्हणजे हरियाणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट्स आणि प्रत्यक्ष मतदानाचे निकाल वेगळे निघाले. त्यामुळे आम्ही या बाबतीत तपास सुरू केला.”
हेही वाचा: Mirzapur Train Accident: रेल्वे रुळ ओलांडताना मिर्झापूरमधील चुनार रेल्वे स्टेशनवर भीषण अपघात; 4 प्रवाशांचा मृत्यू
राहुल गांधींनी सांगितलं की, “जेव्हा मी ही माहिती प्रथम पाहिली तेव्हा मला विश्वासच बसला नाही. मी माझ्या टीमला अनेकदा पडताळणी करण्यास सांगितले. हे केवळ राजकीय आरोप नाहीत, तर ठोस पुराव्यांवर आधारित तथ्य आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आला.” राहुल गांधींनी एक आश्चर्यकारक दावा करत सांगितले की, “वोटर लिस्टमध्ये एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो 22 वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर वापरण्यात आला आहे. त्या फोटोखाली कधी सीमा, कधी स्वीटी, तर कधी सरस्वती असे नाव देण्यात आले आहे. हे स्पष्टपणे एक ‘सेंट्रलाइज्ड ऑपरेशन’ आहे. अशी 25 लाखांहून अधिक बनावट नोंदी आमच्याकडे आहेत.”
शेवटी राहुल गांधींनी सांगितले की, “हरियाणात काँग्रेस केवळ 22,779 मतांनी पराभूत झाली. जर मतदार याद्यांतील ही फसवणूक झाली नसती, तर निकाल पूर्णतः वेगळा असता. मी भारतातील तरुणांना हे समजावू इच्छितो की हा प्रश्न केवळ राजकारणाचा नाही, तर आपल्या लोकशाहीच्या भविष्यासंबंधी आहे.” राहुल गांधींच्या या आरोपांनंतर हरियाणातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून निवडणूक आयोगाकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
हेही वाचा: New Pension Rule: कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती आणि कुटुंब पेन्शनमधील गोंधळ संपला! केंद्र सरकारने जारी केले नवीन पेन्शन नियम