नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये राहुल गांधींनी पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेजची मागणी केली आहे. 'मी नुकतेच पूंछमधील त्या जागेला भेट दिली होती जिथे पाकिस्तानी गोळीबारात 4 मुलांसह 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले', असेही पत्रात म्हटले आहे. तसेच, राहुल गांधींनी पत्रात म्हटले की, 'अचानक आणि अंदाधुंदपणे झालेल्या या हल्ल्यामुळे सामान्य भागात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची शेकडो घरे, दुकाने, शाळा तसेच धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. यादरम्यान, अनेक पीडितांनी सांगितले की, 'आपण वर्षानुवर्षे केलेली मेहनत एका झटक्यात वाया गेली'.
हेही वाचा: जहाल नक्षलवादी हिडमा अटकेत; नक्षलवादी कारवाईत मोठं यश
'पूंछ आणि इतर सीमावर्ती भागातील लोक गेल्या अनेक दशकांपासून शांततेत आणि बंधुत्वाने राहत आहेत. आज, जेव्हा ते या गंभीर संकटातून जात आहेत, तेव्हा त्यांचे दुःख समजून घेणे आणि त्यांचे जीवन पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे', असे पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले. 'मी भारत सरकारला पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या इतर सर्व भागांसाठी एक ठोस आणि उदार मदत आणि पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची विनंती करतो', असेही काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी पूंछला भेट दिली:
नुकताच, खासदार राहुल गांधींनी जम्मू-काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारातील पीडितांची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी या भेटीची माहिती एक्सवरून दिली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, 'तिथे गेल्यानंतरच पूंछ येथे होणारा त्रास जाणवतो. तुटलेली घरे, विस्कळीत जीवन. या वेदनेच्या प्रतिध्वनीतूनही, फक्त एकच आवाज येतो आणि ते म्हणजे आपण भारतीय एक आहोत. मी सरकारला विनंती करत नाही, पण सरकारला त्याची जबाबदारी आठवून देत आहे की पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या इतर भागांसाठी एक ठोस, उदार आणि तात्काळ मदत आणि पुनर्वसन पॅकेज तयार केले पाहिजे. ही मदत नाही, तर कर्तव्य आहे'.