Female Commando Death: दिल्लीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकात (SWAT) कमांडो म्हणून तैनात असलेल्या 27वर्षीय काजल चौधरी या महिला योद्ध्याचा तिच्याच पतीने अत्यंत निर्घृणपणे संपवलं. 'हा कॉल रेकॉर्डिंगवर ठेव, पोलिसांना पुराव्यासाठी कामाला येईल,' असे मेव्हण्याला फोनवर सांगत नराधम पतीने काजलच्या डोक्यात डंबेलचे वार केले. ही धक्कादायक घटना 22 जानेवारीला पश्चिम दिल्लीतील मोहन गार्डन येथे घडली असून, पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर काजलने 27 जानेवारीला जगाचा निरोप घेतला.
लाईव्ह कॉलवर बहिणीचा आक्रोश
काजलचा भाऊ निखिल हा स्वतः पोलीस कॉन्स्टेबल आहे. घटनेच्या वेळी काजल निखिलशी फोनवर बोलत असताना पती अंकुरने तिच्या हातातून फोन हिसकावला. अंकुरने निखिलला आव्हान देत म्हटले, "मी तुझ्या बहिणीला मारतोय, पोलीस माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीत." त्यानंतर निखिलला फोनवर काजलच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या ऐकू आल्या आणि फोन कट झाला. काही मिनिटांतच अंकुरने पुन्हा फोन करून ती मेल्याचे निर्लज्जपणे सांगितले.
हेही वाचा - Neral Khopoli : नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून जीवघेणा चाकूहल्ला; शिवसेना माजी जिल्हाध्यक्षाचे नाव समोर
हुंडाबळी आणि छळाची भीषणता
काजल चार महिन्यांची गर्भवती होती, तरीही तिच्याकडून घरातील सर्व कष्टाची कामे करून घेतली जात होती. लग्नात 20 लाख रुपये खर्च, बुलेट आणि सोन्याचे दागिने देऊनही अंकुरच्या कुटुंबीयांचे समाधान झाले नव्हते. "दुसरीकडे लग्न केले असते तर कार मिळाली असती," असे टोमणे तिला मारले जात होते. कर्जबाजारी असलेल्या अंकुरने काजलकडून 5 लाख रुपयेही घेतले होते.
हत्येचा थरार आणि अटक
दरम्यान, 22 जानेवारीला घरगुती वादातून अंकुरने काजलचे डोके आधी दरवाजाच्या चौकटीवर आपटले आणि नंतर डंबेलने तिच्यावर हल्ला केला. काजलला वाचवण्यासाठी तिच्या भावाने अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने अनेक ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला. अखेर गाझियाबादमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
कायदेशीर कारवाई
सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी काजलच्या मृत्यूनंतर आता अंकुरवर कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे. या दाम्पत्याला दीड वर्षांचा एक मुलगा असून तो सध्या काजलच्या पालकांकडे आहे.