नवी दिल्ली: रेल्वे नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board, RRB) अंतर्गत RRB Group D Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची आज अखेरची तारीख असून आज रात्री नोंदणी प्रक्रिया बंद होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भरती मोहिमेद्वारे लेव्हल 1 अंतर्गत एकूण 22,195 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांमध्ये ट्रॅक मेंटेनर ग्रेड-IV, हेल्पर, असिस्टंट, असिस्टंट पॉइंट्समन आदी पदांचा समावेश आहे. अर्ज केवळ अधिकृत संकेतस्थळ www.rrbapply.gov.in द्वारेच स्वीकारले जाणार असून उमेदवारांनी संबंधित लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करावा. ही भरती भारतीय रेल्वेच्या विविध विभागांसाठी केली जात आहे.
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 33 वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
हेही वाचा: GST Collection Increased: युद्धाच्या सावटात भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी; फेब्रुवारीत 1 कोटी 82 लाख कोटींचे जीएसटी संकलन, कर वसुलीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा 'नंबर एक'
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार असून प्रथम संगणक आधारित परीक्षा (Computer Based Test ,CBT) घेतली जाईल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी (Physical Efficiency Test, PET) आणि शेवटी वैद्यकीय तपासणी (Medical Test) होईल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2026 रोजी सुरू झाली होती. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2026 आहे, तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. अर्जातील दुरुस्ती करण्यासाठी 5 ते 14 मार्च 2026 हा कालावधी देण्यात आला आहे.
अंतिम क्षणी तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात, त्यामुळे उमेदवारांनी विलंब न करता तात्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेतील स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीची संधी गमावू नये, यासाठी आजच अर्ज करणे आवश्यक आहे.
हेही वाचा: Stock Market Today: 'युद्धाचा टँक सीमेवर आणि पोर्टफोलिओ व्हेंटिलेटरवर'; दलाल स्ट्रीटवर मूड ऑफ करणारा सोमवार, काय घडलं?