कोलकाता: कालची ती संस्मरणीय रात्र… कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानाने असा एक क्रिकेट चमत्कार पाहिला, ज्याची अपेक्षा फार कमी चाहत्यांनी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ‘व्हर्च्युअल क्वार्टरफायनल’ सामन्यात टीम इंडिया विजयासाठी मैदानात उतरली आणि संजू सॅमसनने 97 धावांची नाबाद खेळी साकारत सामना तर जिंकून दिलाच, पण त्याच्या निवडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या टीकाकारांनाही जोरदार उत्तर दिले.
या विश्वचषक स्पर्धेत संजू सॅमसनचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला ठरला. स्पर्धेच्या सुरुवातीला अभिषेक शर्माच्या अनुपस्थितीत नामिबियाविरुद्ध संधी मिळाल्यानंतर संजूने अवघ्या 8 चेंडूत 22 धावा करत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, प्रभावी कामगिरी असूनही पुढील सामन्यांत त्याला संघाबाहेर बसावे लागले.
दरम्यान, अभिषेक शर्माचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आणि सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशांवर संकट निर्माण झाले.
हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash : अक्षम्य चूक! कॉकपीटमधील थरारक व्हिडीओ, पायलटच्या सीटवर VSRचे मालक, लेकाची प्रशासनाकडे आर्त हाक
सेमीफायनलची शर्यत कठीण होत असताना प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोठा निर्णय घेतला. झिम्बाब्वेविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात संजूला पुन्हा सलामीची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्या सामन्यात तो 15 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. दुसरीकडे अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावत पुनरागमन केले होते. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात संजूला पुन्हा संधी मिळेल का, याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
पण निर्णायक क्षणी कोच गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आपल्या रणनीतीवर ठाम विश्वास ठेवला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी पुन्हा एकदा संजू सॅमसनलाच सलामीसाठी पाठवले. पराभव म्हणजे स्पर्धेबाहेर पडण्याची शक्यता असतानाही घेतलेला हा धाडसी निर्णय अखेर मास्टरस्ट्रोक ठरला. वेस्ट इंडिजच्या धोकादायक फिरकी आक्रमणाविरुद्ध संजूने संयम आणि आक्रमकतेचा अप्रतिम संगम साधत 97 धावांची अविस्मरणीय नाबाद खेळी साकारली आणि भारताचा विजय निश्चित केला.
विजयी धाव घेत मैदानातून परतताना दिसलेले दृश्यही तितकेच भावनिक होते. कर्णधार सूर्यकुमार यादवने कॅप काढून संजूचा सन्मान केला, तर प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला मिठी मारत विश्वासाचे फळ मिळाल्याची जाणीव करून दिली. ही केवळ एका खेळाडूची विजयकथा नव्हती, तर नेतृत्व, संयम आणि प्रतिभेवर ठेवलेल्या विश्वासाची कहाणी होती. संजू सॅमसनला सातत्याने संधी देण्याचा निर्णयच अखेरीस टीम इंडियाला सेमीफायनलकडे नेणारा टर्निंग पॉइंट ठरला.
हेही वाचा: T20 World Cup 2026: इतिहास घडला! टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वात मोठा रन-चेस; सॅमसनच्या वादळी खेळीने कॅरिबियन संघाचा पराभव