नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देऊन पक्षाचे नाव आणि ‘धनुष्य-बाण’ हे चिन्ह त्यांना बहाल करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या आव्हानावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा सुनावणी सुरू केली. भारताचे सरन्यायाधीश (न्या.) सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश असलेले खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे.
ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद सुरू ठेवला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ठाकरे गटाला मान्यता मिळण्याच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेची ओळख आणि पक्षचिन्ह यांवरील वाद हा महाराष्ट्रातील अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या राजकीय संघर्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये दोन्ही गटांनी पक्षाचा वारसा आणि निवडणूकविषयक अधिकारांवर आपला दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे घटनात्मक आणि निवडणूकविषयक परिणाम खंडपीठाकडून तपासले जात असल्याने ही सुनावणी पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.