हरियाणातील फरीदाबाद येथे प्रामाणिकपणाचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले असून एका भंगार व्यावसायिकाने (Scrap Dealer) तब्बल 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांच्या मूळ मालकाला परत करून समाजासमोर प्रामाणिकतेचा आदर्श ठेवला आहे. घरातील जुन्या वस्तूंसोबत चुकून विकले गेलेले हे सोन्याचे दागिने तब्बल चार महिन्यांनंतर पुन्हा कुटुंबाच्या हाती सुरक्षितपणे परत आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेले पाकीट अशोक शर्मा यांचे होते. जानेवारी महिन्यात कुंभमेळा यात्रेसाठी घराबाहेर जाताना चोरीचा धोका टाळण्यासाठी कुटुंबाने दागिने एका बॉक्समध्ये ठेवून तो बॉक्स पोत्यात सुरक्षित ठेवला होता. मात्र दिवाळी स्वच्छतेदरम्यान हेच पोते चुकून भंगार समजून विकण्यात आले.
नंतर दागिने हरवल्याचे लक्षात येताच शर्मा कुटुंबीयांनी संबंधित भंगार विक्रेत्याकडे चौकशी केली, मात्र त्या वेळी दागिन्यांचा काहीच मागोवा लागला नाही. त्यामुळे निराश होऊन कुटुंब घरी परतले. या घटनेमुळे कुटुंबीय मोठ्या मानसिक तणावातून गेले होते, असे शर्मा यांनी सांगितले.
हेही वाचा: PLI Scheme Share: तोटा असूनही टाटा ग्रुपच्या च्या 'या' कंपनीवर पैशांचा पाऊस; काय आहे नेमकं कारण?
दरम्यान, सुमारे चार महिन्यांनंतर भंगार वर्गीकरण करत असताना हाजी अख्तर खान यांना कागदात गुंडाळलेले सोन्याचे दागिने आढळले. दागिने सापडताच त्यांनी कोणताही विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधला आणि ते थेट बल्लभगढ येथील सहाय्यक पोलीस आयुक्त जितेश मल्होत्रा यांच्या कार्यालयात जमा केले.
पोलीस कार्यालयात अधिकृत प्रक्रियेनंतर हे दागिने अशोक शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी हाजी अख्तर खान यांनी सांगितले की, “सोनं सापडल्यानंतर ते योग्य मालकाकडे परत देणे ही माझी नैतिक जबाबदारी होती. माझ्या संपूर्ण कुटुंबानेही या निर्णयाला पाठिंबा दिला.”
या प्रामाणिक कृतीबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त जितेश मल्होत्रा यांनी खान यांचे विशेष कौतुक करत समाजात प्रामाणिकता आजही जिवंत असल्याचे अधोरेखित केले. तसेच नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे ‘प्रामाणिकपणा अजूनही समाजात जिवंत आहे’ हा सकारात्मक संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
हेही वाचा: Gold Silver Rates Today: 'सोन्याच्या किमतीत मोठी उसळी, तर चांदी ..., काय आहेत सोने-चांदीचे तुमच्या शहरातील दर?