जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत आज पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी बजावत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.
चकमकीचा 2 दहशतवादी ठार -
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिले. लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती असलेल्या 3 दहशतवाद्यांपैकी दोन ठार, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. परिसरात सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे. यात ड्रोन, स्निफर डॉग्ज आणि आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे.
हेही वाचा - राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा! राजनाथ सिंह म्हणाले, 'भारत दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाण्यास तयार'
3 दिवसांत दुसरी मोठी चकमक
ही चकमक गेल्या 3 दिवसांतील दुसरी मोठी कारवाई आहे. 28 जुलै रोजी श्रीनगरमधील हरवान परिसरात, दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळ सुरक्षा दलांनी चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याचे उघड झाले होते. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हाशिम मुसा, जिब्रान आणि हमजा अफगाणी यांचा समावेश होता.
हेही वाचा - दहशतवाद्यांना शिक्षा मिळेपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण; पहलगाम हल्ल्यावरून सुप्रिया सुळे संतप्त
ऑपरेशन महादेव -
‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः सीमेवर घुसखोरी आणि आतल्या भागातील अतिरेकी हालचालींना आळा घालण्याचे उद्दिष्ट ठेऊन सुरक्षा दल कारवाई करत आहेत. या ऑपरेशनमध्ये जम्मू-कश्मीर पोलिस, लष्कर, CRPF, आणि एनएसजी यांचा समन्वय आहे. नवीन तंत्रज्ञान, ड्रोन आणि थर्मल डिटेक्शन उपकरणांद्वारे ही शोध मोहीम राबवली जात आहे.