नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील CJP आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून देशभरात चर्चा सुरू आहे. अशातच 20 जुलै रोजी सीजेपी आणि विद्यार्थी आंदोलकांनी जंतर-मंतरवर आंदोलनादरम्यान उपासमार करत या आंदोलनामध्ये सहभाग दाखवला.
असं असताना सीजेपीचे प्रवक्ते विजेता दहिया विद्यार्थ्यांसाठी पुकारलेल्या या आंदोलनात सहभागी न होता गाडीत बसून बर्गर खात असल्याप्रकरणी चर्चेत आले. त्यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी पुकारलेल्या या आंदोलनात सहभागी न होता गाडीत बसून बर्गर खाल्ल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सीजेपीच्या प्रवक्तेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. यानंतर आता विजेता दहिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. मला माझ्या सहकाऱ्यांकडून पाठिंब्याची अपेक्षा होती असं म्हणत त्यांनी प्रवक्तेपदावरुन काढून टाकल्याप्रकरणी दुःख मांडलं आहे.
“पार्टीतून काढून टाकल्यामुळे मला खूपच वाईट वाटलं. एकाच दिवसात दोन विचित्र घटना घडल्या. जंतर-मंतर भरून घरी परतत असताना मेट्रो स्टेशनवर एक वाईट घटना घडली. त्यानंतर पुन्हा जंतर-मंतरवर परत जात असताना देखील वाईट घटना घडली. काही लोकांनी माझ्यासोबत धक्काबुक्की केली. माझ्या विरोधात गोष्टी बोलल्या. त्यावेळी मला अनेक मित्रांकडून फोन आले आणि माझ्या सुरक्षिततेबाबत विचारणा केली. याच दरम्यान अभिजीत दीपकेनेही मला फोन केला. माझी अपेक्षा होती की तो देखील मला पाठिंबा देईल, पण तसे घडले नाही.”
“आशुतोष आणि अभिजीत दोघांनी मला फोनवर सांगितले की तू आंदोलनात येऊ नकोस. तुझा बर्गर वाला व्हिडिओ व्हायरल झाला असल्यामुळे तू न येणे जास्त चांगले आहे. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न देखील केला की कोणी काहीही बडबड केली तरी तुम्हाला माझ्याबद्दल कल्पना आहे. मी तुमच्याबरोबर गेली दोन दिवस काम करत आहे. दिवस-रात्र काम करत आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. पण अभिजीतने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला पाठिंबा दिला नाही. अभिजीत जेव्हा कचोरी खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता, तेव्हा देखील त्याच्यावर टीका झाली होती. पण त्या वेळेला मी त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याचा बचाव करण्यासाठी पुढेच आलो. पण माझ्या बाबतीत सपोर्ट करण्याच्या वेळ आली तेव्हा हे दिसले नाही. इतकेच नव्हे तर अभिजीत दिपके ट्रकवर चढवून मोर्चात सामील झाला असेही काहींनी म्हटले होते, पण त्यावेळीही मी त्याचा बचाव केला की थप्पड देखील त्यांनीच खाल्ली होती. पण या लोकांनी मला अजिबात पाठिंबा दिला नाही. माझ्याच लोकांनी मला बळीचा बकरा केला. याचे मला खूप दुःख झाले,”