Sunday, March 08, 2026 01:19:31 PM

GST Fraud: धक्कादायक! महिन्याला 6 हजार रुपये कमावणाऱ्या शिक्षकाला 2 कोटींची GST नोटीस

व्यवसायाने शिक्षक असलेल्या ओम प्रकाश यांना जीएसटी विभागाकडून पोस्टाद्वारे 1,99,42,313 कर भरण्याची नोटीस मिळाली.

gst fraud धक्कादायक महिन्याला 6 हजार रुपये कमावणाऱ्या शिक्षकाला 2 कोटींची gst नोटीस

GST Fraud: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सामान्य खाजगी शिक्षकाला कोट्यवधी रुपयांची कर नोटीस मिळाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सिद्धार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज भागातील रहिवासी ओम प्रकाश वर्मा यांच्यासाठी 10 फेब्रुवारी 2026 हा दिवस एखाद्या भयानक स्वप्नासारखा ठरला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या ओम प्रकाश यांना जीएसटी विभागाकडून पोस्टाद्वारे 1,99,42,313 कर भरण्याची नोटीस मिळाली. महिन्याला केवळ 6,000 ते 7,000 कमावणाऱ्या व्यक्तीसाठी ही रक्कम ऐकणेही असह्य झाले आहे. नोटीस मिळाल्यापासून ते मदतीसाठी पोलीस स्टेशन आणि कर विभागाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. 

पॅन कार्डचा गैरवापर आणि कोट्यवधींचे व्यवहार
ओम प्रकाश यांनी जेव्हा विक्रीकर विभागाच्या मुख्यालयात जाऊन चौकशी केली, तेव्हा एका मोठ्या फसवणुकीचा उलगडा झाला. तपासात असे दिसून आले की, अज्ञात फसवणूक करणाऱ्यांनी ओम प्रकाश यांच्या PAN Card चा गैरवापर करून त्यांच्या नावाने दिल्ली आणि फारुखाबादमध्ये दोन वेगवेगळ्या फर्मची नोंदणी केली होती. दिल्लीतील "Om Traders" नावाच्या फर्ममधून गेल्या वर्षी 11 कोटी पेक्षा जास्त व्यवहार झाले होते. या मोठ्या उलाढालीच्या आधारे जीएसटी विभागाने त्यांना अंदाजे 2 कोटी कर भरण्याची नोटीस बजावली. आपल्या कागदपत्रांचा वापर करून कोणीतरी कोट्यवधींचे व्यवहार करत आहे, याची पुष्टी झाल्याने पीडित शिक्षक हादरून गेला आहे.

हेही वाचा - Badlapur Ovary Trafficking: बदलापुरात अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस; तीन महिला पोलिसांच्या ताब्यात

बनावट कंपन्यांचे जाळे आणि पीडिताची मागणी
पीडित ओम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील फर्म व्यतिरिक्त फारुखाबादमध्ये त्यांच्या नावाने Verma Enterprises नावाची दुसरी एक बनावट कंपनी देखील सुरू करण्यात आली होती. "मी एक गरीब माणूस आहे आणि मला एका मोठ्या कटात अडकवले जात आहे," असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी डुमरियागंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रशासनाकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे. कर विभागाच्या रेकॉर्डवर ओम प्रकाश यांचेच नाव असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, मात्र आता त्यांना केवळ निष्पक्ष चौकशी आणि खऱ्या गुन्हेगारांना अटक होण्याची प्रतीक्षा आहे.


सम्बन्धित सामग्री