Sonam Wangchuk Latest Updates : पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 18 जुलै रोजी जंतर मंतर येथील उपोषणस्थळावरून दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. या कारवाईमुळे 20 जुलै रोजी निघणारा त्यांचा नियोजित संसदेवरील मोर्चा लांबणीवर पडणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, वांगचुक यांनी रुग्णालयातूनच आपली पत्नी गीतांजली यांच्यामार्फत देशवासीयांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश पाठवला आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा नियोजित मोर्चा काढण्याचे आणि तो यशस्वी करण्याचे जाहीर आवाहन केले असून, या आंदोलनाला ‘भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ’ असे संबोधले आहे.
भयमुक्त आणि अन्यायमुक्त भारताची हाक
कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडिया (एक्स) वर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात एका कागदावर लिहून आपला हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला आहे. त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, ’20 जुलै हे स्वातंत्र्यासाठीचे दुसरे आंदोलन असून ते भयमुक्त आणि अन्यायमुक्त भारतासाठी आहे.’ यासोबतच देशातील पेपर लीकसारख्या गंभीर अन्यायापासून आणि आपल्याला झालेल्या बेकायदेशीर अटकेच्या भीतीपासून मुक्ती मिळवणे हाच या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील नागरिकांनी या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
Message from Sonam Sir: 20th JULY आज़ादी का दूसरा आन्दोलन
भय मुक्त भारत, अन्याय मुक्त भारत Freedom from injustice (Like paper leaks)
Freedom from Fear (my illegal detention) India’s 2nd FREEDOM MOVEMENT
March to the Parliament
Please make it a big success Sent through… pic.twitter.com/mdNqLiCA23 — Cockroach is Back (@Cockroachisback) July 19, 2026
वांगचुक यांची प्रकृती आणि वैद्यकीय अहवाल
दरम्यान, प्रदीर्घ उपोषणामुळे सोनम वांगचुक यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून (डिहायड्रेशन) त्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांचाही एका पथकात समावेश करण्यात आला आहे. रुग्णालयाने जाहीर केलेल्या बुलेटिननुसार त्यांची पोटॅशियमची पातळी वेगाने कमी होत आहे. परंतु, वांगचुक यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाने सुचवलेल्या वैद्यकीय उपचारांना अद्याप अधिकृत संमती दिलेली नाही.
सरकारी रुग्णालयावर अविश्वास आणि न्यायालयाचे दार
सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालावर तीव्र अविश्वास व्यक्त केला असून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी वांगचुक यांना तातडीने एखाद्या खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी आरोप केला आहे की, रुग्णालयाने वांगचुक यांची पोटॅशियम पातळी 2.9 पर्यंत घसरल्याचे सांगून भीतीचे वातावरण निर्माण केले, मात्र सार्वजनिक हेल्थ बुलेटिनमध्ये नेमका आकडा लपवून ठेवला. एका स्वतंत्र प्रयोगशाळेत (लॅब) केलेल्या चाचणीत ही पातळी 3.5 आढळून आली असून ती पूर्णपणे सामान्य मर्यादेत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.