Railway New Rules: रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणे हा अनेकांसाठी अत्यंत सोयीचा आणि आरामदायी पर्याय मानला जातो. मात्र, प्रवासादरम्यान काही प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे किंवा नियमांच्या उल्लंघनामुळे इतरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी आता दक्षिण रेल्वेने (Southern Railway) एक अत्यंत कडक आणि नवा नियम लागू केला आहे. जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर असताना मोबाईलवर स्पीकरवर गाणी किंवा व्हिडिओ मोठ्या आवाजात ऐकत असाल, तर ते आता तुमच्या चांगलेच अंगलट येऊ शकते.
पहिल्या चुकीसाठी 1,000 रुपयांचा दंड; वारंवार नियम मोडल्यास…
दक्षिण रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मोबाईलचा मोठ्या आवाजात वापर करून इतर प्रवाशांच्या शांततेचा भंग केल्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जर तुमच्या मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यामुळे कोणत्याही सहप्रवाशाला त्रास झाला आणि त्याने रेल्वे प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली, तर तुम्हाला 1,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, हीच चूक एखाद्या प्रवाशाकडून वारंवार घडल्यास दंडाची रक्कम वाढवून 5,000 रुपये केली जाईल आणि थेट 6 महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची (Jail) कारवाईही केली जाऊ शकते.
हेही वाचा – आयकर विभागात 119 पदांवर मोठी भरती; 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना करता येणार अर्ज, किती मिळणार पगार?
प्रवाशांच्या तक्रारींनंतर नियमावलीत बदल
सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असून अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यात हेडफोन न वापरता उघड्या आवाजात व्हिडिओ किंवा गाणी लावतात. यामुळे रात्रीच्या वेळी किंवा प्रवासादरम्यान विश्रांती घेणाऱ्या इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होते. प्रवाशांकडून सातत्याने येणाऱ्या या तक्रारींची गंभीर दखल घेत दक्षिण रेल्वेने आपल्या प्रवासाच्या नियमावलीत हा मोठा बदल केला आहे. त्यामुळे विना तिकीट प्रवास करणे, अस्वच्छता पसरवणे किंवा विनाकारण साखळी ओढणे यांसोबतच आता मोठ्या आवाजात मोबाईल वाजवणेही गंभीर गुन्हा मानला जाणार आहे.
प्रवासातील शिस्त राखण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी अनिवार्यपणे हेडफोन किंवा इयरफोनचा वापर करावा. इतर प्रवाशांच्या हक्कांचा व शांततेचा आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि त्रासमुक्त व्हावा या उद्देशानेच हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता रेल्वेने प्रवास करताना मोबाईलचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि शिस्तीत करणे गरजेचे ठरणार आहे.
हेही वाचा – भारताचा पासपोर्ट असेल तर या 55 देशांमध्ये मिळणार विना-व्हिसा प्रवेश; जाणून घ्या, पर्यटनाचे सुलभ पर्याय
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.