Accident News: तेलंगणामध्ये रविवारी सकाळी एक अत्यंत भीषण अन् हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. सूर्यापेट जिल्ह्यातील पिल्लालमारी भागात खम्मम-हैदराबाद महामार्गावरून जात असलेली एक आलिशान वोल्वो कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकली. अपघातानंतर वाहनाने तात्काळ पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटांत आगीच्या लोळांनी संपूर्ण कारला वेढले. ही घटना सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास घडली. कारमध्ये अडकल्याने एका सुप्रसिद्ध न्यूरोसर्जनचा घटनास्थळीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. महामार्गावर घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुटुंबाला भेटायला जाताना घात
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. पोलिसांनी वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून मृत व्यक्तीची ओळख निश्चित केली आहे. कसाकुर्ती जगदीश असे मृत डॉक्टरांचे नाव असून ते खम्मम येथील ममता रुग्णालयात वरिष्ठ न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत होते. ते खम्ममहून हैदराबाद येथे राहणाऱ्या आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले असतानाच वाटेत हा प्राणघातक अपघात घडला.
हेही वाचा – CCTV बसवण्याचं काम सुरू असतानाच काळाचा घाला; भरधाव डंपरने क्रेन-ऑटोला उडवलं, HR मॅनेजरसह तिघांचा मृत्यू
पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी आल्याचा संशय
अपघाताच्या प्राथमिक पाहणीनंतर, चालकाला पहाटेच्या वेळी डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकाला लागलेली धडक अतिशय भीषण होती, ज्यामुळे इंधन टाकी किंवा वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग भडकल्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून जळालेल्या अवशेषांचे नमुने गोळा केले आहेत. अपघाताचे नेमके कारण आणि कारमधील तांत्रिक त्रुटी तपासण्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.