नवी दिल्ली: भारताचा अभिमान आणि ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला बुधवारी झालेल्या पिपिंग समारंभात भारतीय लष्करात ‘सन्माननीय लेफ्टनंट कर्नल’ या पदाने गौरविण्यात आले. या नियुक्तीचा आदेश भारत सरकारच्या राजपत्रात (Gazette of India) प्रकाशित करण्यात आला असून, ही नियुक्ती 16 एप्रिलपासून नियुक्त झाली आहे.
नीरज चोप्राने आपल्या सैनिकी कारकिर्दीची सुरुवात 26 ऑगस्ट 2016 रोजी नाईक सुबेदार म्हणून केली होती. त्याच्या अपूर्व क्रीडा कामगिरीमुळे त्याला 2021 मध्ये सुभेदार पदावर बढती देण्यात आली होती.
त्याच्या या प्रवासात अनेक सन्मानांची भर पडली आहे. 2018 मध्ये ‘अर्जुन पुरस्कार तर 2021 मध्ये ‘खेळ रत्न पुरस्कार’ देऊन भारत सरकारने त्याच्या उत्कृष्ट क्रीडा कामगिरीचा गौरव केला.
टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजला भारतीय लष्कराचा ‘परम विशिष्ट सेवा पदक (Param Vishisht Seva Medal - PVSM) 2022 मध्ये प्रदान करण्यात आला. हा लष्करातील सर्वोच्च सन्मान आहे.
हेही वाचा: Travel Credit Card: विमान प्रवासात मोठी बचत! 'ही' 6 क्रेडिट कार्ड्स देतील सवलत, रिवॉर्ड्स आणि फ्री फ्लाइट व्हाउचर
27 वर्षीय या भालाफेकीपटूला 2022 मध्ये सुबेदार मेजर पदावर बढती देण्यात आली आणि त्याच वर्षी त्याला ‘पद्मश्री’, देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान, प्राप्त झाला.
अलीकडील विश्व अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (World Athletics Championship) नीरजने 84.30 मीटर भालाफेक करत आठवे स्थान पटकावले. सलग 26 स्पर्धांमध्ये पहिल्या दोन स्थानांवर राहण्याची त्याची मालिका यानंतर थांबली.
या स्पर्धेत त्याचा सहकारी भारतीय खेळाडू सचिन यादव याने 86.27 मीटर भालाफेक करत चौथे स्थान मिळवले, जरी तो पदकाच्या शर्यतीत थोडक्यात अपयशी ठरला.
नीरज चोप्राचा हा सन्मान केवळ त्याच्या क्रीडा कामगिरीचा गौरव नाही, तर देशासाठी दिलेल्या निष्ठेचा आणि सेवाभावाचा सन्मान आहे. भारतीय लष्करात त्याचा ‘सन्माननीय लेफ्टनंट कर्नल’ म्हणून समावेश हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
हेही वाचा: MNS Diwali Deepotsav Mumbai: ‘दीपोत्सवाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न’, मनसेकडून सरकारच्या पर्यटन विभागाची कानउघडणी; म्हणाले, 'हा उमदेपणा नाही!'