Kidney Infection: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात किडनी संसर्गाच्या प्रकरणांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी नागपूरच्या रुग्णालयात चार वर्षीय विकास यदुवंशी या मुलाचा किडनी संसर्गामुळे मृत्यू झाला, ज्यामुळे गेल्या 22 दिवसांत या आजारामुळे एकूण सात मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, विकास यदुवंशीचा शनिवारी नागपूर रुग्णालयात मृत्यू झाला. तथापी, दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार त्याच्या गावी, दिघवानी गावात पार पडला. छिंदवाडा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या तामिया आणि कोयलांचल भागात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. काही मुलांवर अजूनही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा दंडाधिकारी शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, सरकारी डॉक्टरांना संसर्गाच्या लक्षणांसह मुलांना त्वरित आणि पूर्ण वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. प्रगत उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना नागपूरच्या एम्समध्ये पाठवण्यात येईल आणि आवश्यक असल्यास 'पीएम श्री एअर अॅम्ब्युलन्स सेवा' वापरून उपचार सुनिश्चित केले जातील.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही फोनवरून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत असे निर्देश दिले आहेत. जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. दीपक पटेल यांनी सांगितले की, आतापर्यंत एक ते सात वर्ष वयोगटातील सात मुलांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या पथकाने प्रभावित भागाचे सर्वेक्षण केले असून पाण्याचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, कार्यवाहक मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (सीएमएचओ) नरेश गुन्नाडे यांनी सांगितले की, संसर्गाची सुरुवात 24 ऑगस्ट रोजी नोंदवली गेली. तथापी, पहिला मृत्यू 7 सप्टेंबरला झाला. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उच्च ताप आणि लघवी करण्यास त्रास दिसतो. सध्या छिंदवाडा जिल्ह्यातील तीन आणि नागपूरमधील चार मुलांवर उपचार सुरू असून त्यांची स्थिती धोक्याबाहेर आहे.