वॉशिंग्टन: भारतीय वंशाच्या सुप्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी तब्बल 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नासामधून निवृत्ती स्वीकारली आहे. केवळ 10 दिवसांसाठी नियोजित असलेली त्यांची शेवटची अंतराळ मोहीम तब्बल नऊ महिने लांबल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. नासाने मंगळवारी अधिकृत घोषणा करत सांगितले की, त्यांची निवृत्ती 27 डिसेंबर 2025 पासून लागू झाली आहे.
नासाचे प्रशासक जॅरेड आयझॅकमन यांनी सुनीता विल्यम्स यांचे कौतुक करताना सांगितले की, मानवी अंतराळ मोहिमांमध्ये त्यांनी नेतृत्व, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील शोधयात्रेसाठी भक्कम पायाभरणी केली. लो अर्थ ऑर्बिटमधील व्यावसायिक अंतराळ मोहिमा, चंद्र आणि मंगळासाठी सुरू असलेल्या आर्टेमिस कार्यक्रमापर्यंत त्यांच्या योगदानाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय वंशाच्या असलेल्या सुनीता विल्यम्स यांची नासामध्ये निवड 1998 साली झाली होती. तीन वेगवेगळ्या अंतराळ मोहिमांमधून त्यांनी एकूण 608 दिवस अंतराळात घालवले. हा आकडा नासाच्या इतिहासातील एकूण अंतराळातील वास्तव्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील दीर्घ मुक्कामाचा मोठा वाटा आहे.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar : वैजापुरात व्यापाऱ्यानं गळफास घेत संपवलं जीवन; 42 सेकंदांच्या व्हिडिओत मांडली व्यथा, 7 जणांवर गुन्हा दाखल
सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत नऊ अंतराळ स्पेस वॉक पूर्ण केले असून, त्यांचा एकूण कालावधी 62 तास 6 मिनिटे इतका आहे. महिला अंतराळवीरांमध्ये हा आजवरचा सर्वाधिक वेळ असून, नासाच्या सर्वकालीन यादीत त्या चौथ्या क्रमांकावर आहेत. अंतराळात मॅरेथॉन पूर्ण करणारी पहिली व्यक्ती होण्याचा मानही सुनीता विल्यम्स यांनाच मिळाला आहे.
त्यांची पहिली अंतराळ झेप 9 डिसेंबर 2006 रोजी स्पेस शटल डिस्कव्हरी (एसटीएस-116) द्वारे झाली होती. एक्स्पिडिशन 14 आणि 15 दरम्यान त्यांनी फ्लाइट इंजिनिअर म्हणून काम करत चार अंतराळ चाल पूर्ण करून तेव्हाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. दुसरी मोहीम 14 जुलै 2012 रोजी कझाकिस्तानमधील बैकोनूर अंतराळ केंद्रातून सुरू झाली, ज्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील तांत्रिक दुरुस्त्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
तिसरी आणि सर्वात दीर्घ मोहीम जून 2024 मध्ये बोईंग स्टारलाइनर क्रू फ्लाइट टेस्ट अंतर्गत सुरू झाली. या मोहिमेत बुच विलमोर यांच्यासोबत त्या एक्स्पिडिशन 71 आणि 72 चा भाग होत्या. दोघेही अंतराळवीर मार्च 2025 मध्ये पृथ्वीवर परतले. या मोहिमेदरम्यान त्यांनी एकाच वेळी 286 दिवस अंतराळात होत्या.
निवृत्तीनंतरच्या प्रतिक्रियेत सुनीता विल्यम्स म्हणाल्या, “अंतराळ हे माझे सर्वात आवडते ठिकाण आहे. ते माझं घर आहे. तीन वेळा अंतराळात जाण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी सन्मानाचे आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, तेथील लोक, अभियांत्रिकी आणि विज्ञान यामुळेच चंद्र आणि मंगळाच्या पुढील मोहिमा शक्य झाल्या. आता नासा इतिहास घडवताना पाहण्याची मला उत्सुकता आहे.” अंतराळविश्वात झेपावणाऱ्या पिढ्यांसाठी सुनीता विल्यम्स या नेहमीच प्रेरणास्थान राहतील.
हेही वाचा: Devendra Fadnavis In Davos : 'तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर यशस्वीपणे...'; दावोसमधून मुख्यमंत्र्यांनी मांडला महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा