Tuesday, June 09, 2026 02:22:27 PM

Suvendu Adhikari : एकेकाळी ममतादीदींच्या अगदी जवळचे आणि अत्यंत विश्वासू... आता कट्टर विरोधक; कोण आहेत सुवेंदु अधिकारी?

ज्या नंदीग्राम आंदोलनाने ममता बॅनर्जींना 34 वर्षांच्या डाव्यांची सत्ता उलथवून लावत सत्तेवर बसवले, त्या आंदोलनाचे मुख्य सूत्रधार सुवेंदू अधिकारीच होते. आज तेच ममता बॅनर्जींच्या विरोधात...

suvendu adhikari  एकेकाळी ममतादीदींच्या अगदी जवळचे आणि अत्यंत विश्वासू आता कट्टर विरोधक कोण आहेत सुवेंदु अधिकारी

Suvendu Adhikari BJP CM candidate : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाची घोडदौड सुरू असताना मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. एकेकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी राहिलेले सुवेंदू अधिकारी आता त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहेत.

2021 च्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपकडून लढताना नंदीग्राममध्ये खुद्द ममता बॅनर्जींचा पराभव करून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे, या जागेवरून आता ममता बॅनर्जी निवडणूक लढवत नाही आहेत. त्यांच्या जागी तृणमूल काँग्रेसचे पवित्र कर हे भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांच्या विरोधात उभे आहेत. या दोन नेत्यांदरम्यान काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

ज्या नंदीग्राम आंदोलनाने ममता बॅनर्जींना 34 वर्षांच्या डाव्यांची सत्ता उलथवून लावत सत्तेवर बसवले, त्या आंदोलनाचे मुख्य सूत्रधार सुवेंदू अधिकारीच होते. आज तेच अधिकारी ममतांच्या खुर्चीला मोठा धक्का देत भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून चर्चेत आहेत.

राजकीय सम्राट आणि प्रभावशाली घराणे
अविवाहित असलेले 55 वर्षीय सुवेंदू अधिकारी हे पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील एका शक्तिशाली राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे 2009 ते 2014 दरम्यान मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्री होते. अधिकारी कुटुंबाचा या भागात इतका दबदबा आहे की, त्यांना या पट्ट्यातील 'राजकीय सम्राट' मानले जाते. सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ दिव्येंदू आणि सौमेंदू हे देखील लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेसमधून केली होती, त्यानंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आणि आता ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून भाजपची धुरा सांभाळत आहेत.

हेही वाचा - West Bengal Election Result : बंगालमध्ये 'पोरिबोर्तन' का घडलं? भाजपचा विजय, दीदींचा पराभव... नेमकी कारणं काय?

नंदीग्राम ते भाजप प्रवेशाचा प्रवास
2007 मधील नंदीग्राम आंदोलनाने सुवेंदू अधिकारी यांना 'फायरब्रँड' नेता म्हणून ओळख मिळवून दिली. इंडोनेशियाच्या सलीम समूहाच्या रासायनिक प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या या आंदोलनात 14 मार्च 2007 रोजी 14 आंदोलकांचा बळी गेला होता, ज्यामुळे राज्याचे राजकारण बदलले आणि ममता बॅनर्जी सत्तेत आल्या. या यशानंतर सुवेंदू अधिकारी यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. ते ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी बनले. 2011 मध्ये तृणमूल सत्तेत आल्यानंतर त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये तामलुकमधून लोकसभेची निवडणूक जिंकली. 2016 मध्ये तृणमूलच्या विजयानंतर त्यांना राज्यात बोलावून मंत्रीपद देण्यात आले. त्यांच्याकडे परिवहन खात्यासह इतर महत्त्वाची मंत्रालये सोपवली. परंतु अभिषेक बॅनर्जी यांचा वाढता प्रभाव आणि प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि बंगालमध्ये भाजपचा मुख्य आधारस्तंभ बनले.

मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार
सध्याच्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी केवळ नंदीग्रामच नव्हे, तर भवानीपूर मतदारसंघातूनही आपले नशीब आजमावत आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता अधिक आहे. अविवाहित राहिलेले आणि पूर्णवेळ राजकारणाला वाहून घेतलेले अधिकारी हे सध्या भाजपच्या रणनीतीचे केंद्रबिंदू आहेत. तृणमूलमध्ये एकेकाळी दुसऱ्या क्रमांकाचे नेते राहिलेले अधिकारी आता ममता बॅनर्जींचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सज्ज झाले असून, बंगालच्या सत्तेत पहिल्यांदाच 'कमळ' फुलवण्यासाठी त्यांचे योगदान ऐतिहासिक मानले जात आहे.

हेही वाचा - West Bengal Elections 2026: ममता दीदींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग! 'भाजपचे पितामह' श्यामा प्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये मोदी-शाहाने कसं फुलवलं कमळ ?


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या