Suvendu Adhikari: पश्चिम बंगालच्या राजकारणात एक ऐतिहासिक पर्व सुरू होत असून भाजप नेते सुवेंदू अधिकारी राज्याचे नवे मुख्यमंत्री बनण्यास सज्ज झाले आहेत. शुक्रवारी कोलकाता येथे पार पडलेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला. 293 पैकी 207 जागा जिंकून भाजपने बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले असून, सुवेंदू अधिकारी हे बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरतील.
'दीदींना 9 जिल्ह्यांमध्ये आपले खातेही उघडता आले नाही'
दरम्यान, अमित शाह यांनी नमूद केले की, एकूण 23 जिल्ह्यांपैकी असे 9 जिल्हे आहेत जिथे दीदींना आपले खातेही उघडता आले नाही. हा त्यांचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे. "मी यापूर्वी कधीही इतका प्रचंड जनादेश पाहिला नव्हता. सहसा, जेव्हा एखादे सरकार चांगली कामगिरी करते, तेव्हा त्याला जनादेश मिळतो.
'बंगालमध्ये 207 आमदारांना पाहून माझे हृदय आनंदाने भरून आले' - अमित शाहा
अमित शाह यांनी म्हटलं की, "बंगालमध्ये भाजपचे 207 आमदार पाहून माझे हृदय आनंदाने भरून आले आहे. आम्ही आता सीमांचे रूपांतर एका अभेद्य किल्ल्यात करू. आम्ही 'सोनार बांगला' (सुवर्ण बंगाल) घडवू." शाह यांनी भवानीपूरच्या जनतेचे विशेष आभार मानले.
भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव; नंदीग्राममध्येही विजय
सुवेंदू अधिकारी यांनी या निवडणुकीत नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही हाय-प्रोफाईल मतदारसंघांतून दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, भवानीपूरमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 55 वर्षीय अधिकारी हे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 'करकुली' गावचे रहिवासी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बंगालमध्ये सत्तांतर घडवून आणले आहे. शनिवारी, 9 मे रोजी सकाळी 11:00 वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
तीन दशकांचा राजकीय प्रवास: नगरसेवक ते थेट मुख्यमंत्री
सुवेंदू अधिकारी यांची राजकीय कारकीर्द अत्यंत संघर्षमय आणि प्रदीर्घ राहिली आहे. 15 डिसेंबर 1970 रोजी जन्मलेल्या सुवेंदू यांना वडील माजी केंद्रीय मंत्री शिशिर अधिकारी यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले. 1995 मध्ये कांताई नगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. 2005 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले, तर 2009 आणि 2014 मध्ये तामलुक मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. नंदीग्राममधील भूसंपादन विरोधी आंदोलनामुळे त्यांना 'मेदिनीपूरचे राजे' ही उपाधी मिळाली. डिसेंबर 2020 मध्ये तृणमूलचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी 2021 ते 2026 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी बजावली.
हेही वाचा - Thalapathy Vijay TVK: मोठा सस्पेन्स संपला! TVKला काँग्रेससह 4 पक्षांचा पाठिंबा; तमिळनाडूत थलपती विजय सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर
राजकीय वारसा आणि सामाजिक समर्पण
सुवेंदू अधिकारी अविवाहित असून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी समर्पित केले आहे. त्यांचे कुटुंबही राजकारणात सक्रिय असून भाऊ दिब्येंदू अधिकारी माजी खासदार आहेत, तर दुसरे भाऊ सौम्येंदू अधिकारी सध्या कांथीचे खासदार आहेत. त्यांच्या आई गायत्री अधिकारी यांचेही त्यांना मोठे पाठबळ लाभले आहे. तब्बल 30 वर्षांच्या राजकीय तपश्चर्येनंतर सुवेंदू अधिकारी आता बंगालची सूत्रे हाती घेणार असून, त्यांच्याकडून राज्याच्या विकासाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.