तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावर 'थलापती' विजय यांनी दिमाखात प्रवेश तर केला आहे, पण सत्तेच्या 'क्लायमॅक्स'मध्ये मात्र आकड्यांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. दशकांपासून चालत आलेली द्रविडी पक्षांची मक्तेदारी मोडीत काढत विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने ऐतिहासिक मुसंडी मारली खरी, मात्र सत्तेचे सिंहासन अद्याप हाकेच्या अंतरावरच आहे. 4 मे रोजी जाहीर झालेल्या निकालानंतर विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी 118 या 'जादूई आकड्या'पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अद्याप मोठी कसरत करावी लागत आहे. या अनिश्चिततेच्या वातावरणात 'झोहो'चे (Zoho) सह-संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी मांडलेल्या एका प्रस्तावाने तामिळनाडूच्या राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले आहे.
राज्यात सरकार स्थापनेसाठी लहान पक्षांची जुळवाजुळव सुरू असताना, श्रीधर वेम्बू यांनी थेट 'राष्ट्रपती राजवट' लागू करण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर त्यांची भूमिका मांडताना वेम्बू म्हणाले की, "सध्याची आकडेवारी पाहता कोणताही स्थिर पर्याय दिसत नाही. ओढाताण करून किंवा दबाव तंत्राने स्थापन केलेले कोणतेही सरकार अल्पजीवी ठरेल आणि विविध दबावामुळे राज्याचा विकास खुंटेल. तामिळनाडूची जनता अधिक चांगल्या आणि स्थिर सरकारला पात्र आहे." त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले असून, 'अस्थिर सरकारपेक्षा नव्याने निवडणुका' हा विचार अनेकांना विचार करायला लावणारा ठरत आहे.
वेम्बू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अत्यंत रोखठोक मते मांडली आहेत. त्यांच्या मते, राष्ट्रपती राजवट लागू करून पुन्हा निवडणुका घेणे हाच सध्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, या वेळी 'मतांसाठी रोख रक्कम नाही' (No cash for votes) या नियमाची अत्यंत कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच जनतेचा खरा जनादेश समोर येईल, असे त्यांनी सुचवले आहे. जर पारदर्शक निवडणुका झाल्या, तर विजय हे प्रचंड बहुमतासह पुन्हा सत्तेवर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, DMK आणि AIADMK या प्रस्थापित शक्तींना रोखण्यासाठी त्यांनी एकत्र लढावे, असे सांगत त्यांनी भाजपलाही स्वबळावर मैदानात उतरण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: Trisha Krishnan In Politics: सुपरस्टार थलापती विजय यांची कथित प्रेयसी अभिनेत्री त्रिषा कृष्णनची राजकारणात एन्ट्री?
निवडणुकीच्या निकालानंतर तामिळनाडूच्या राजकारणाने कूस बदलली आहे. 108 जागा जिंकून विजय यांनी 'जायंट किलर'ची भूमिका बजावली असली, तरी बहुमतासाठी 10 जागांची कमतरता भासत आहे. राज्यपालांनी 118 सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र मागितल्यामुळे विजय यांच्या गोटात सध्या हालचालींना वेग आला आहे. लहान पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा भक्कम करण्यासाठी 'थलापती' प्रयत्नशील आहेत. मात्र, श्रीधर वेम्बू यांच्यासारख्या उद्योग जगतातील मोठ्या व्यक्तीने थेट फेरनिवडणुकीचा प्रस्ताव मांडल्याने, विजय यांच्या मार्गात तांत्रिक आणि नैतिक अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे, तामिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी आपला पराभव मान्य करत पदाचा राजीनामा दिला आहे. द्रविडी पक्षांच्या बालेकिल्ल्यात विजय यांनी लावलेला हा सुरुंग म्हणजे दक्षिणेतील राजकारणातील एका मोठ्या बदलाची नांदी मानली जात आहे. मात्र, 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था होऊ नये, यासाठी विजय यांना आता त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा कस लावावा लागणार आहे. केवळ चित्रपटगृहात शिट्ट्या मिळवणारा चाहतावर्ग आता सत्तेच्या खुर्चीपर्यंत विजय यांना कसे पोहोचवतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
एकूणच, तामिळनाडूच्या राजकारणात सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका आहे. श्रीधर वेम्बू यांनी सुचवलेला राष्ट्रपती राजवटीचा पर्याय आणि नव्याने निवडणुका घेण्याची शक्यता यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सत्तेसाठी आकड्यांची जुळवाजुळव होणार की तामिळनाडू पुन्हा एकदा मतपेटीकडे वळणार, याचा निर्णय आता येणारा काळच ठरवेल. 'लोकशाहीचा विजय' व्हावा, हीच सध्या तामिळनाडूच्या जनतेची माफक अपेक्षा आहे.
हेही वाचा: PM Narendra Modi: ऑपरेशन सिंदूरची वर्षपूर्ती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलला सोशल मीडियावरील 'प्रोफाईल फोटो'