सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर डोराबजी टाटा ट्रस्ट या दोन्ही विश्वस्त मंडळाने अलीकडच्या प्रशासकीय मतभेदांना मागे टाकत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ट्रस्टने वेणू श्रीनिवासन यांची कायमस्वरूपी विश्वस्त आणि उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. हा निर्णय नोएल टाटा यांच्या जानेवारी 2025 मध्ये झालेल्या आजीवन नियुक्तीनंतरचा आणखी एक निर्णायक टप्पा ठरला आहे. त्यामुळे या निर्णयाचे औद्योगिक आणि आर्थिक महत्त्व अधिक आहे.
2024 मध्ये झालेल्या बैठकीत विश्वस्तांनी एकमताने ठरवलं की, कालावधी संपल्या नंतर सर्व विश्वस्त आजीवन पदावर राहतील आणि त्यांच्या पुनर्नियुक्तीची गरज भासणार नाही. बैठकीत आणखी एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली, जर कोणत्याही विश्वस्ताने दुसऱ्या विश्वस्ताच्या पुनर्नियुक्तीच्या विरोधात जावून मतदान केले, तर त्याला धर्मादाय संस्थांमधून अपात्र ठरवले जाईल. यातून येत्या काळात विश्वस्तपदावर अस्थिरता येऊ नये, हा हेतू स्पष्ट दिसतो.
हेही वाचा: KBC 17 Ishit Bhatt: कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर मधील उद्धट वागण्यानंतर इशित भट्टची माफी; म्हणाला.....
नोशीर सोनावला, यांनी वाढत्या वयामुळे आणि आरोग्याच्या कारणास्तव पद सोडले होते. त्या काळात कार्यकाळ तीन वर्षांचा असायचा आणि नूतनीकरणाची प्रक्रिया नियमितपणे होत असे. मात्र आता नव्या धोरणानुसार सर्व विश्वस्तांना कायमस्वरूपी पद देण्यात येणार आहे.
या बैठकीत टाटा सन्सच्या संचालक मंडळावर 75 वर्षांची वयोमर्यादा लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर नोएल टाटा यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नेमण्यात आलं आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
सध्या ट्रस्टच्या कार्यकारी समितीत नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, मेहली मिस्त्री, विजय सिंग, प्रमित झवेरी, डॅरियस खंबाटा हे आहेत. ही समिती टाटा सन्सच्या शेअरहोल्डिंग आणि ट्रस्टच्या इतर महत्वाच्या निर्णया संबंधित कामकाज करत असते.
गेल्या काही महिन्यांपासून विश्वस्तांमध्ये काही मतभेद वाढले होते, विशेषतः विजय सिंग यांच्या पुनर्नियुक्तीच्या वेळी. बहुसंख्य विश्वस्तांनी त्यांना पाठिंबा न दिल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विश्वस्त मंडळाने पुन्हा स्थैर्य निर्माण करण्यासाठी आणि विश्वास वाढवण्यासाठी वेणू श्रीनिवासन यांची आजीवन नियुक्ती जाहीर केली. या निर्णयामुळे ट्रस्टमध्ये एकजूट वाढण्यासोबतच टाटा समूहाच्या धोरणात्मक निर्णयांना नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.
हेही वाचा: Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंगमुळे शेअर बाजारात तेजी येणार का? उद्या 'या' वेळेतचं करता येतील व्यवहार