इंजिनिअरिंग कॉलेजमधील दांडिया महोत्सवात दुर्दैवी घटना; लोखंडी कमान कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, 12 जखमी

महोत्सवाच्या समारोपादरम्यान स्टेजवर प्रकाशयोजनेसाठी उभारलेला एक मोठा लोखंडी सांगाडा अचानक कोसळल्याने झालेल्या अपघातात प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 12 विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
इंजिनिअरिंग कॉलेजमधील दांडिया महोत्सवात दुर्दैवी घटना; लोखंडी कमान कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, 12 जखमी
Telangana Dandia festival accident

तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या दांडिया महोत्सवादरम्यान एक अत्यंत हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना घडली आहे. महोत्सवाच्या समारोपादरम्यान स्टेजवर प्रकाशयोजनेसाठी उभारलेला एक मोठा लोखंडी सांगाडा अचानक कोसळल्याने झालेल्या अपघातात प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 12 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात आणि महाविद्यालयीन वर्तुळात एकच शोककळा पसरली आहे. सोना नारायण दास (प्रथम वर्ष, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभाग) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपप्रसंगी घडली दुर्घटना

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नादरगुल येथील एमव्हीएसआर (MVSR) अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय ‘संगमम’ नावाचा वार्षिक तांत्रिक व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या आग्रहखातर संध्याकाळी 5:30 ते 6:00 या वेळेत दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो विद्यार्थी मैदानावर आनंदात दांडिया खेळत असताना, अचानक आलेल्या तीव्र वाऱ्यामुळे सजावटीच्या दिव्यांचा आणि उपकरणांचा भार झेलणारी मोठी लोखंडी कमान नाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा अपघात इतक्या वेगात घडला की विद्यार्थ्यांना बाजूला होण्यास कोणतीही संधी मिळाली नाही.

हेही वाचा – तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; खामगाव-पंढरपूर महामार्गावरील भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

घटनेची माहिती मिळताच महाविद्यालय प्रशासनाने तातडीने मदतकार्य करत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. काही रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्यामुळे कॉलेजच्या वाहनांचा वापर करून विद्यार्थ्यांना ‘प्रत्युषा’ रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, मृत विद्यार्थिनीचे काका सुरेश यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत हा पूर्णपणे व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा असल्याचे म्हटले आहे. 80 फूट उंचीची कमान पुरेशा आधाराशिवाय आणि असुरक्षित पद्धतीने उभी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, महाविद्यालयाचे संचालक प्रसन्न कुमार यांनी हा एक अनपेक्षित नैसर्गिक अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे. या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, भाजप नेते अंडाला श्रीरामुलू यादव यांनी घटनास्थळी भेट देत महाविद्यालय प्रशासनाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर तपासाला सुरुवात केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version