जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा; जबाबदारी नाकारत भारतावर उलटा आरोप

जम्मू-कश्मीरच्या पहलगामजवळ दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू; पाकिस्तानने जबाबदारी नाकारत भारतावरच अशांततेचा आरोप केला

जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा; जबाबदारी नाकारत भारतावर उलटा आरोप

पहलगा:जम्मू-कश्मीरमधील पहलगामजवळ नुकताच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संपूर्ण देशात या घटनेबद्दल संताप आणि हळहळ व्यक्त होत असतानाच पाकिस्तानने मात्र या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतालाच अशांतता पसरवण्याचा आरोप केला आहे.

ख्वाजा आसिफ हे पाकिस्तानातील सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे वरिष्ठ नेते असून, पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना या हल्ल्यात पाकिस्तानचा कुठलाही सहभाग नसल्याचे सांगितले. त्यानंतर भारत सरकारने हा हल्ला पाकिस्तानपुरस्कृत असल्याचा आरोप केल्यानंतर ख्वाजा आसिफ यांनी उलट भारतावरच आरोप करत, भारत स्वतः आपल्या देशात अशांतता निर्माण करत आहे आणि त्याचा दोष पाकिस्तानवर ढकलतो, असे वक्तव्य केले.

या वक्तव्यामुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, तज्ज्ञांनी याला पाकिस्तानची नेहमीची रणनीती असल्याचे म्हटले आहे. गेल्या अनेक दशकांपासून जम्मू-कश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानमधील संघटनांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी वेळोवेळी सादर केले आहेत. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तान अशा घटनांपासून स्वतःला दूर ठेवत आला आहे.

हेही वाचा :काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना 'राज्य आपत्ती व्यवस्थापन' कक्षामार्फत हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

हल्ल्यानंतर भारतीय गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणा एकत्रित तपास करत असून, प्राथमिक तपासात हल्लेखोर हे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी गटाशी संबंधित असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संघटना पाकिस्तानातून कार्यरत असून, अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादासंदर्भात चर्चेत राहिल्या आहेत.

दरम्यान, या हल्ल्यामुळे देशभरात शोककळा पसरली असून, केंद्र सरकारने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत, दहशतवादाचा सामना करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या उलट्या प्रतिक्रिया नेहमीच दहशतवादाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठबळ देण्याचा प्रकार मानल्या जातात. जागतिक समुदायानेही पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या अशा घटनांची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे, अशी भावना भारतातील राजकीय आणि संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.सध्या जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर असून, घटनास्थळी कसून तपास सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष ऑपरेशन्स सुरू करण्यात आले आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number