Thalapathy Vijay historic win 2026 : तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. हे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेक दिग्गजांनी केले, पण त्यांना यश आले नाही. मात्र, सुपरस्टार थलपती विजयने आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 100 हून अधिक जागांवर आघाडी घेत इतिहास रचला आहे. चित्रपटसृष्टीतील करिअरला पूर्णविराम देऊन राजकारणात उतरलेल्या विजय यांनी तमिळ मतदारांची नाडी अचूक ओळखली. त्यांनी केवळ राज्यातील प्रस्थापितांनाच नाही तर, राष्ट्रीय पक्षांनाही आश्चर्याचा धक्का दिला असून, टीव्हीके (TVK) आता तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. मात्र, यापुढील काळात विजय यांचे काम कसे राहील, यावर त्यांच्या पुढील वाटचालीची गती आणि दिशा अवलंबून राहील.
रजनीकांत: लोकप्रियतेनंतरही राजकारणातून माघार
सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा गेल्या 25 वर्षांपासून तमिळनाडूच्या गल्ली-गल्लीत सुरू होती. रजनीकांत यांचा चाहतावर्ग थलपती विजयपेक्षा कितीतरी मोठा होता आणि त्यांच्याकडून बदलाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, 2020 मध्ये प्रकृतीचे कारण आणि कोरोना महामारीचे संकट यामुळे त्यांनी एकही निवडणूक न लढवता राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. रजनीकांत यांनी घेतलेली ही माघार चाहत्यांसाठी निराशाजनक ठरली होती. तर विजयने मात्र, 2024 मध्ये पक्ष स्थापन करून 2026 च्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद झोकून दिली.
कमल हासन: मर्यादित प्रभाव आणि बदललेली भूमिका
कमल हासन यांनी 2019 आणि 2021 मध्ये आपल्या 'मक्कल नीथी मय्यम' (MNM) पक्षाद्वारे राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, त्यांचा प्रभाव केवळ शहरी भागातील सुशिक्षित आणि बुद्धिजीवी मतदारांपुरताच मर्यादित राहिला, ज्यामुळे त्यांना मोठी झेप घेता आली नाही. 2026 च्या या महत्त्वाच्या निवडणुकीत तर कमल हासन यांनी स्वतः मैदानात न उतरता डीएमके आघाडीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणे पसंत केले. विजयने मात्र कमल हासन यांच्यासारखी चूक न करता ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही स्तरांतील मतदारांना आपल्या लोककल्याणकारी घोषणांनी आपलेसे केले.
हेही वाचा - Vijay Thalapathy : चित्रपटसृष्टीनंतर राजकारणात जबरदस्त एन्ट्री; साऊथ सुपरस्टार विजयला कुटुंबाचीही भक्कम साथ, नव्या प्रवासात असा दिला पाठिंबा
विजयकांत: आघाड्यांच्या राजकारणात प्रभाव ओसरला
थलपती विजयच्या आधी 'कॅप्टन' विजयकांत यांनी 2006 मध्ये 8 टक्के मते मिळवून प्रस्थापितांना धक्का दिला होता. 2011 मध्ये त्यांनी एआयएडीएमकेसोबत युती करून विरोधी पक्षनेतेपदही भूषवले. मात्र, सातत्याने आघाड्यांमध्ये 'ज्युनिअर पार्टनर' म्हणून राहिल्याने त्यांच्या डीएमडीके पक्षाचा स्वतंत्र प्रभाव कमी होत गेला. 2023 मध्ये विजयकांत यांचे निधन झाले, पण त्यापूर्वीच त्यांचा पक्ष मुख्य प्रवाहातून मागे पडला होता. याउलट, थलपती विजयने कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती न करता 'एकला चलो रे'ची भूमिका घेत स्वतःला डीएमके आणि एआयएडीएमकेचा प्रबळ पर्याय म्हणून सिद्ध केले.
'विजयी' रणनीती
रजनीकांत, कमल हासन आणि विजयकांत या तिन्ही दिग्गजांच्या मर्यादांचा अभ्यास करून विजयने आपली वेगळी रणनीती आखली. त्याने राजकारणात येण्यास रजनीकांत यांच्याप्रमाणे उशीर केला नाही आणि विजयकांत यांच्याप्रमाणे कोणाच्या सावलीत राहणे स्वीकारले नाही. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक न लढवता त्याने दोन वर्षे केवळ तळागाळात संघटना बांधणीवर भर दिला. 2026 ची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा त्याचा धाडसी निर्णय आणि सर्व स्तरांतील लोकांसाठी दिलेल्या 7 प्रभावी आश्वासनांमुळे तो आज तामिळनाडूचा नवा 'किंग' ठरला आहे.
हेही वाचा - Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय थलपती यांचा राजकारणातला डेब्यू 'सुपरहिट'; या 7 घोषणा ठरल्या गेमचेंजर