Tamil Nadu Election 2026 : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सध्या मोठी उलथापालथ होताना दिसून येतेय. यंदाची निवडणूक ही सुपरस्टार अभिनेता थलपती विजय याच्यामुळे गाजली आहे. थलपती विजयने 'तामिळगा वेत्री कळघम' म्हणजे TVK पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवली आणि मोठा विजय मिळवला आहे. थलपती विजयने डीएमके आणि अण्णा डीएमकेचा डाव उधळून लावला आहे. थलपती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
बालपण ते सुपरस्टार
जोसेफ विजय चंद्रशेखर... विजय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचा जन्म 22 जून 1974 रोजी चेन्नईत झाला. वडील एस.ए. चंद्रशेखर हे चित्रपट दिग्दर्शक आणि आई शोभा चंद्रशेखर या पार्श्वगायिका आहेत. विजय तामिळ सिनेमातील मोठा स्टार असून चाहते प्रेमाने त्याला थलपती असे संबोधतात. थलपती विजयने वयाच्या 10 व्या वर्षी वेत्री चित्रपटात भूमिका साकारुन या क्षेत्रात पदार्पण केलं. नायक म्हणून नालाया थीर्पू चित्रपटात काम केलं पण बॉक्स ऑफिसवर तो अपयशी ठरला. 'घिल्ली' या चित्रपटाने विजयला सुपरस्टार बनवले. थलाइवा, थुपाक्की, काठी, मर्सल आणि बिगिल यांसारख्या चित्रपटातील भूमिकांमधून विजयने अँग्री यंग मॅनची इमेज तयार केली. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे.
विजयचा राजकीय प्रवास
2009 मध्ये विजयने फॅन क्लब "विजय मक्कल इयक्कम"ची (विजयची जनचळवळ) स्थापना केली. या फॅन क्लबच्या तामिळनाडूत अंदाजे 85 हजार शाखा होत्या. 2011 च्या निवडणुकीत विजयने AIADMK-नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर 2021 च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयच्या संघटनेने 115 जागा जिंकल्या. 2फेब्रुवारी 2024 ला विजयने 'तमिलगा वेत्री कझगम' (TVK) या पक्षाची स्थापन केली आणि 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत लढण्याची घोषणा केली. TVK च्या पहिल्या राजकीय परिषदेत विजयने भाजपला 'वैचारिक विरोधक' आणि DMK ला 'राजकीय प्रतिस्पर्धी' संबोधले. तसेच DMK वर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोप केले.
2026 ची निवडणूक आणि घोषणा
7 मार्च 2026 ला थलपती विजयने पक्षाचा जाहीरनामा सादर केला. यात प्रामुख्याने महिलांना आर्थिक मदत, मोफत गॅस सिलेंडर, सरकारी बसमध्ये मोफत प्रवास, नवविवाहितेला एक तोळा सोने आणि साडी तसेच नवजात बालकाला सोन्याची अंगठी, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य आणि महिला सुरक्षा या प्रमुख घोषणा होत्या. TVK ने तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना आकर्षित केले तसेच विधानसभा निवडणूक कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकट्याने लढवणार, हे जाहीर करुन थलपती विजय तामिळनाडूच्या राजकारणातील महत्त्वाचा नेता बनला.
पहिल्याच निवडणुकीत TVK ला मिळालेल्या ऐतिहासिक विजयामुळे DMK आणि अण्णा DMK ला मोठा धक्का बसला आहे. DMK आणि अण्णा DMK या दोघांच्या स्पर्धेत TVK च्या तिसऱ्या पर्यायामुळे तामिळनाडूच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. सध्याच्या निकालावरुन थलपती विजय हा तामिळनाडूच्या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूत 234 विधानसभेच्या जागा आहेत. तर 118 हा बहुमताचा आकडा आहे. सध्या तामिळनाडूत डीएमकेचं सरकार असून एम के स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत. डीएमकेसोबत काँग्रेस तर अण्णा डीएमकेसोबत भाजप विधानसभेची निवडणूक लढतोय.