Pahalgan Attack: 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील नयनरम्य बैसारन भागात मानवी क्रूरतेचा कळस पाहायला मिळाला होता. उद्या या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 'मिनी-स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटन स्थळावर पाकिस्तान पुरस्कृत 'लष्कर-ए-तैयबा'च्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या संघटनेच्या 3 दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता. या भीषण हल्ल्यात 26 हिंदू पुरुषांना आपला जीव गमवावा लागला होता, ज्यामध्ये एका नेपाळी नागरिकाचाही समावेश होता. ज्या वेळी हा हल्ला झाला, तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर होते.
धार्मिक ओळख पटवून नृशंस हत्या
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला. 7 फूट उंच जाळीच्या कुंपणाने वेढलेल्या या मैदानातून बाहेर पडण्याच्या मार्गावर त्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी पुरुष, स्त्रिया आणि मुलांची विभागणी केली आणि केवळ पुरुषांना लक्ष्य केले. मृतांपैकी अनेकांची धार्मिक ओळख पटवण्यासाठी त्यांच्या पँटच्या झिप उघड्या करण्यात आल्या होत्या, ज्यातून या हल्ल्याचा जातीय द्वेष स्पष्ट झाला. पुण्याचे व्यावसायिक संतोष जगदाळे यांना 'कलमा' म्हणता न आल्याने त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या, तर दुसरीकडे कलमाचा जप केल्यामुळे आसामचे प्राध्यापक देबाशीष भट्टाचार्य यांचा जीव वाचला.
मानवतेचे दर्शन आणि सुन्न करणारी दृश्ये
या हल्ल्याचे सर्वात हृदयद्रावक चित्र म्हणजे नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल. लग्नाला अवघा 1 आठवडा झालेला असताना आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या हिमांशीचा व्हिडिओ पाहून संपूर्ण देश हादरला होता. मात्र, अशा भीषण दुखातही हिमांशीने मानवतेचा परिचय दिला. तिने स्पष्ट केले की, तिला कोणत्याही धर्माबद्दल द्वेष नाही, तिला फक्त शांतता आणि तिच्या पतीच्या मारेकऱ्यांना न्याय हवा आहे.
भारताचे चोख प्रत्युत्तर: 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'ऑपरेशन महादेव'
या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले. भारताने 'सिंधू पाणी करार' स्थगित केला आणि सीमारेषा बंद केल्या. भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर, पळून गेलेल्या 3 मुख्य हल्लेखोरांना शोधण्यासाठी 'ऑपरेशन महादेव' सुरू करण्यात आले. एनआयए (NIA), भारतीय लष्कर, पॅरा स्पेशल फोर्सेस आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी ड्रोन आणि प्रगत सेन्सर्सच्या मदतीने 300 चौरस किलोमीटरचा परिसर पिंजून काढला.
हेही वाचा – Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याला उद्या 1 वर्ष पूर्ण! भारतीय लष्कराचा शत्रूला कडक इशारा
दहशतवाद्यांचा खात्मा
सततच्या पाठलागामुळे दहशतवादी महादेव रांगेतील दाचिगामच्या घनदाट जंगलात आश्रयाला गेले होते. अखेर 28 जुलै 2025 रोजी, विशेष दलाच्या तुकडीने अत्यंत दुर्गम भागात 10 तासांची पायी मोहीम आखून या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. उद्या या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभरातून या वीर मृतांना श्रद्धांजली वाहिली जात असून, भारतीय सुरक्षा दलांच्या अजोड शौर्याची पुन्हा एकदा आठवण काढली जात आहे.