Inflation Rate : भारताच्या होलसेल महागाई दराने सलग तिसऱ्या महिन्यात वाढीचा कल दर्शविला असून, जानेवारी महिन्यात तो 1.81 टक्के वर पोहोचला आहे. अन्नपदार्थ, अन्नेतर वस्तू आणि उत्पादित उत्पादनांच्या किमतींमध्ये महिनाभरात झालेल्या वाढीमुळे हा निर्देशांक वधारल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात होलसेल किंमत निर्देशांक (WPI) आधारित महागाई दर 2.51 टक्के होता, तर डिसेंबर 2026 मध्ये तो 0.83 टक्के इतका नोंदवण्यात आला होता.
अन्नधान्य आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ
उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जानेवारी 2026 मधील महागाई वाढीमागे मूलभूत धातू उत्पादन, इतर मॅन्युफॅक्चरिंग, अन्नेतर वस्तू, अन्नपदार्थ आणि कापड उद्योगातील वाढीव किमती हे मुख्य कारण आहे. आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये अन्नपदार्थांचा महागाई दर 1.55 टक्के होता, जो डिसेंबरमध्ये 0.43 टक्क्यांनी घसरला होता. भाज्यांच्या महागाई दरात जानेवारीत 6.78 टक्के घट झाली असली तरी, उत्पादित उत्पादनांमधील घाऊक महागाई दर डिसेंबरमधील 1.82 टक्के वरून वाढून जानेवारीत 2.86 टक्के झाला आहे.
इंधन आणि वीज क्षेत्रात दिलासा, पण खाद्यपदार्थ महागले
अन्न श्रेणीतील होलसेल महागाई दराने मोठी झेप घेतली असून तो डिसेंबरमधील 2.95 टक्क्यांवरून थेट 7.58 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई दरात घसरण कायम असून जानेवारीत तो 4.01 टक्के राहिला (डिसेंबरमध्ये हा दर 2.31 टक्के होता). घाऊक महागाईसोबतच रिटेल महागाईचा दरही महत्त्वाचा असून, गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार जानेवारीत किरकोळ (रिटेल) महागाई दर 2.75 टक्के नोंदवला गेला आहे.
आरबीआयची धोरणे आणि रेपो दर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपली पतधोरणे आणि व्याजदर ठरवण्यासाठी प्रामुख्याने किरकोळ महागाईचा आधार घेते. केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंत रेपो दरात एकूण 1.25 टक्के कपात केली आहे. या कपातीनंतर सध्याचा रेपो दर 5.25 टक्के इतका आहे. मात्र, महागाईचा हा वाढता कल पाहता आगामी काळात आरबीआय काय भूमिका घेते, याकडे बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.